Unseasonal rain in Maharashtra today : महाराष्ट्रात पुन्हा एकदा निसर्गाचा लहरीपणा पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासांत राज्याच्या विविध भागांत अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. ठाणे, नंदूरबार आणि रायगड जिल्ह्यांतील काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या आहेत. या अवकाळी पावसामुळे आणि गेल्या २४ तासांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे राज्यातून थंडी गायब झाली आहे. पुणे, मुंबईसह उपनगरांमध्ये सकाळपासूनच आकाश ढगाळ आहे. हवेतील आर्द्रता वाढल्याने थंडीचा कडाका कमी झाला आहे. पावसाच्या शिडकाव्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
हवामान तज्ज्ञांच्या मते बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे बाष्पयुक्त वारे वाहत आहेत. त्याचा परिणाम राज्याच्या हवामानावर झाला आहे. या बदलामुळे किमान तापमानात वाढ झाली असून हुडहुडी भरवणारा गारठा सध्या ओसरला आहे. पुढील २४ तास असेच वातावरण राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
रायगड आणि ठाण्यात पावसाचा शिडकाव
रायगड जिल्ह्यात पहाटे चार वाजेच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. पेण तालुक्यातील जोहे आणि हमरापूर परिसरात पावसाच्या सरी बरसल्या. या पावसाचा सर्वाधिक फटका पेणमधील गणपती कारखान्यांना आणि वीटभट्ट्यांना बसण्याची भीती निर्माण झाली आहे. कच्च्या मूर्ती आणि वीटभट्ट्यांवरील विटा पावसामुळे खराब होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, ठाण्यातील घोडबंदर रोड आणि आसपासच्या परिसरात पावसाचा शिडकाव झाला. ठाणेकरांना ऐन हिवाळ्यात पावसाळी वातावरण अनुभवायला मिळत आहे.
नंदुरबारमध्ये पिकांचे नुकसान; शेतकरी चिंतेत
उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याला अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. शहादा शहरात पावसाने जोरदार बॅटिंग केली, तर जिल्ह्यात सर्वत्र हलक्या सरी कोसळल्या. या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे गणित पूर्णपणे बिघडले असून पपई आणि गहू पिकाला सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे. सातपुड्याच्या डोंगराळ भागातील आंबा आणि कैरी उत्पादनावरही संकट आले. पावसामुळे मोहोर गळून पडल्यास उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त होत आहे. हाताशी आलेला घास हिरावला गेल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.