तुळजापूर: महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री तुळजाभवानी देवी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सध्या सुरू असून, त्याअंतर्गत मंदिराच्या शिखराच्या दुरुस्तीचे महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. मंदिराच्या गर्भगृहाच्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये संपूर्ण शिखर काढण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, या कामाच्या प्रक्रियेला भोपे पुजारी मंडळाने तीव्र विरोध दर्शवला आहे.
भोपे पुजारी मंडळाच्या मते, मंदिराचा ऐतिहासिक आणि पौराणिक वारसा जपण्याऐवजी संपूर्ण मंदिर पाडून नव्याने बांधण्याचा विचार होत आहे. याला विरोध करताना मंडळाने पुरातत्त्व विभागालाही सवाल केले आहेत. "पुरातत्त्व विभाग संवर्धनासाठी आहे, ऐतिहासिक महत्त्व नष्ट करण्यासाठी नाही," असा आरोप भोपे पुजाऱ्यांनी केला आहे.
मंदिर संस्थानने पुण्यातील एका खासगी कंपनीकडून स्ट्रक्चरल ऑडिट करून संपूर्ण मंदिराच्या मजबुतीकरणाचा आढावा घेतला आहे. मात्र, हे ऑडिट भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडून व्हावे, अशी मागणी भोपे पुजाऱ्यांनी केली आहे. बांधकाम तज्ज्ञ आणि पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मंदिराच्या जीर्णोद्धारावर चर्चा व्हावी," असेही ते म्हणाले.
भोपे पुजारी मंडळाने मंदिराचा जुना ऐतिहासिक ठेवा टिकवण्यासाठी लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. "आईच्या मंदिराला हात लावण्याचा प्रयत्न झाल्यास आम्ही कायदेशीर लढा देऊ आणि आंदोलन करू," असा इशारा भोपे पुजारी मंडळाने दिला आहे.
पुढे ते म्हणाले, "मंदिराच्या परिसरात सुधारणा करण्यास आमचा विरोध नाही. भाविकांच्या सोयीसाठी परिसर वाढवावा, पुजाऱ्यांच्या घरांबाबत योग्य तोडगा काढावा, परंतु ऐतिहासिक मंदिर पाडण्याचा घाट आम्ही सहन करणार नाही."
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.