नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातून दोन राष्ट्रीय महामार्ग जातात या महामार्गावरून परराज्यात जाण्यासाठी अक्कलकुवा आणि नवापूर तालुक्यात वाहनांची दोन सीमा तपासणी नाके आहेत. या सीमा तपासणी नाक्यावर उपप्रादेशिक परिवहन विभागाद्वारे चोवीस तास वाहनांची तपासणी केली जाते. यातून शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. जिल्ह्यातील दोन्ही सीमा तपासणी नाक्यावर परराज्यातून येणारे अनेक वाहने शासनाचा महसूल बुडवून चोर मार्गाने महाराष्ट्रात प्रवेश करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तमराव जाधव यांनी अशा वाहनांवर पाचपट दंड वसुलीची कारवाई सुरू केली आहे. (The RTO has levied five times the fine from the drivers who are drowning the government revenue)
हे देखील पहा -
चोर मार्गाने येणाऱ्या वाहनांना पकडल्यावरच कर भरायचा अन्यथा शासनाचा महसूल बुडवून विना कर भरताच पळवाट काढणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन कायदा कलम 161 C4 प्रमाणे वाहन कराच्या पाचपट दंड वसूल केला जात असल्याने शासनाचा कर बुडवून चोर मार्गाने जाणाऱ्या वाहनांवर जरब बसली आहे. याव्यतिरिक्त अवैध वाहतूक, ओवरलोड अवजड वाहने, अवैध वाळू वाहतूक व नियमापेक्षा जास्त वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दंड स्वरूपात कारवाई करून गेल्या जुलै महिन्यात शासनाला 16 लाख 87 हजार रुपयांचा महसूल मिळालेला आहे. या कारवाई अंतर्गत 10 वाहनांवर फिटनेस बाबत केस करण्यात आली आहे. तसेच क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन जाणाऱ्या चार खाजगी लक्झरी बसेसवर कारवाई केली आहे, सीमा तपासणी नाक्यावर 25 अवजड वाहने ओवरलोड माल घेऊन जाताना कारवाई करून दंड वसूल करण्यात आला आहे.
नंदुरबार जिल्हा व जवळच्या गुजरात राज्यातून तापी नदीतून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा करून त्याची वाहतूक जिल्ह्यातून केली जाते. उप प्रादेशिक परिवहन विभागाद्वारे अवैध वाळू वाहतूक व क्षमतेपेक्षा जास्त वाळू घेऊन जाणाऱ्या वाहनांवर कारवाई करून रॉयल्टीची पेनल्टीसाठी संबंधित तहसीलदारांकडे अधिक कारवाईसाठी वर्ग केले जाते. गेल्या जुलै महिन्यात वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये तब्बल 22 वाहनचालकांचे लायसन्स 90 दिवसांसाठी सस्पेंड करण्याची कारवाई करण्यात आली आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात जवळपास 60 टक्के कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. या विभागात 31 पदे मंजूर असून फक्त दहाच कर्मचारी कार्यरत आहे. महाराष्ट्रातील शेवटचा जिल्हा तसेच मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यांच्या सीमा लगत भाग असल्याने याठिकाणी मनुष्यबळ वाढविणे गरजेचे आहे. कमी मनुष्यबळात देखील उत्तम कामगिरी करण्याचे काम उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर व उत्तमराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
अपघात कमी व्हावे यासाठी रोड सेफ्टीबाबत वाहनचालकांना वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते. जिल्ह्यातील सातपुडा अतिदुर्गम भागात अनेक मानवी चुकीमुळे अपघात झाले आहेत. या भागात पब्लिक ट्रान्सपोर्टची सुविधा नाही तसेच रोड इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत नसल्याने या भागातील नागरिक खाजगी वाहनांच्या टपावर क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांच्या वाहतुकीमुळे अपघात होण्याचे सत्र सुरूच आहे. यावर शासनाने उपाययोजना करण्याची गरज आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.