गिरीश कांबळे, प्रतिनिधी| ता. २३ डिसेंबर २०२३
काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर विधानसभेच्या उप सभापती निलम गोऱ्हे यांची बदनामी केल्याचा आरोप करण्यात आला होता. राज्याच्या हिवाळी अधिवेशनात भाजप नेते प्रविण दरेकर यांनी सुषमा अंधारेंच्या हक्कभंगाचा प्रस्तावही मांडला होता.
यावर सुषमा अंधारे यांनी ८ दिवसात माफीचे पत्र दिले नाही तर हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यास परवानगी देऊ, असा इशारा निलम गोऱ्हे यांनी दिला होता. या संपूर्ण प्रकरणावर सुषमा अंधारे यांनी पत्र लिहून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ज्यामध्ये त्यांनी माफी मागणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
सुषमा अंधारेंचे पत्र त्यांच्याच शब्दात..
"प्रिय लोकशाही, तुझ्याबद्दल कायमच मनात आदर आहे आणि तुझं अस्तित्व टिकावं म्हणूनच ही अविरत लढाई आहे. स्वातंत्र्यासाठी ज्या अगणित स्वातंत्र्यवीर आणि वीरांगणांनी प्राणांची आहुती दिली तितकीच कटीबद्धता स्वातंत्र्योत्तर काळात ही संविधानिक लोकशाहीची व्यवस्था टिकवण्यासाठीची आता आमची आहे याचे मला भान आहे."
"व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकात्मता टिकून ठेवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या संविधानिक मूल्यांचा मी कायमच आदर करत आहे आणि इथून पुढेही तो केला जाईल. त्याचाच भाग म्हणून संविधानाने निर्माण केलेल्या कुठल्याही घटनात्मक पदाबद्दल कमालीचा आदर बाळगणे ही माझी कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून पहिली जबाबदारी आहे असे मी मानते..." असे सुषमा अंधारे म्हणाल्यात.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
चंद्रकांत पाटील, भिडेंवर कारवाई का नाही?
''या सभागृहाचे अस्तित्व ज्या संविधानामुळे आहे. त्या संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर किंवा या राज्याची राष्ट्राची आधारशीला ठेवणारे छ. शिवाजी महाराज, म. गांधी , महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज या महापुरुषांचा अपमान जेव्हा मनोहर कुलकर्णी उर्फ भिडे किंवा सरकार दरबारमध्ये मंत्री असणारे श्री चंद्रकांत जी पाटील (Chandrakant Patil) करत होते. तेव्हा याच सभागृहाच्या सभापती पदावरील जबाबदार व्यक्तींनी त्यांच्यावर हक्कभंग का आणला नाही?'' असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.
''महापुरुषांचा अपमान होतोय म्हणून आ .प्रवीण दरेकर किंवा सुधीर मुनगुंटीवार यांनी ठामपणे तात्कालीन राज्यपाल श्री भगतसिंग कोशारी यांच्या संदर्भाने निंदाव्यंजक ठराव सभागृहात का मांडला नाही. सभापती पदावरील व्यक्तीने आठ दिवसाच्या आत ताबडतोब माफी मागा अशी भूमिका श्री चंद्रकांत पाटील किंवा मनोहर कुलकर्णी उर्फ भिडे यांच्याबाबत का घेतली नाही?" असेही त्यांनी म्हणले आहे.
माफी मागण्यास नकार..
"माझ्याकडून काही गुन्हा घडला असेल तर निश्चितपणे मी बिनशर्त माफी मागायला हवी. पण पक्षीय राजकारण म्हणून जे लोक महापुरुषांच्या अपमानावर चकार शब्द काढत नाहीत परंतु निव्वळ विरोधी पक्षाची व्यक्ती आहे म्हणून राजकीय कुरघोडी करण्यासाठी मला झुकवण्याचा प्रयत्न करत असतील तर मात्र मी माफी अजिबात मागणार नाही, भलेही यासाठी कारवाईचा भाग म्हणून मला तुरुंगवास पत्करावा लागला तरीही माझी तयारी आहे..." अशी स्पष्ट भूमिका सुषमा अंधारे यांनी मांडली आहे. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.