विश्वभूषण लिमये, साम टीव्ही
सोलापूर: कुणी लग्नासाठी मुलगी देता का मुलगी? असा उद्विग्न सवाल करत सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कुरुल येथील एका 28 वर्षीय तरुणाने थेट जिल्हा परिषद कार्यालयाच्या पूनम गेटसमोर एकदिवसीय धरणे आंदोलन सुरू केले आहे. किसनदेव दत्तात्रेय ननावरे असे या आंदोलक तरुणाचे नाव असून, शेतकरी व बेरोजगार असल्याने लग्न जमत नसल्याची व्यथा त्याने मांडली आहे.
किसनदेव ननावरे यांच्याकडे अर्धा एकर शेती असून ते सध्या बेरोजगार आहेत. आजच्या बहुतांश मुली आणि त्यांचे पालक उच्चशिक्षित, सरकारी नोकरदार किंवा चांगल्या पगाराची नोकरी असलेल्या वरालाच पसंती देत आहेत. परिणामी, अल्पभूधारक शेतकरी आणि बेरोजगार तरुण वयाची उशिराची वर्षे गाठूनही लग्नापासून वंचित राहत आहेत. याच सामाजिक समस्येकडे प्रशासनाचे आणि समाजाचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी हे अनोखे आंदोलन छेडले आहे.
शेतकरी आणि बेरोजगार तरुणांना लग्नासाठी मुलगी मिळावी यासाठी समाजकल्याण विभागामार्फत 'सरकारी सर्वधर्मीय विवाह नोंदणी केंद्र' सुरू करण्यात यावे. विवाहबद्ध होणाऱ्या अशा तरुणांना १ लाख रुपयांचे लग्न अनुदान देण्यात यावे. निवाऱ्यासाठी २ लाख रुपयांचे घरकुल मंजूर केले जावे. स्वावलंबनासाठी आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी २ लाख रुपयांचे बिनव्याजी आणि विनाजामीनदार कर्ज उपलब्ध करून द्यावे.
शेतकरी आणि बेरोजगार तरुणांच्या लग्नाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून, किसनदेव ननावरे यांच्या या आंदोलनाने सोलापूर जिल्ह्यात चांगलाच शब्द आणि चर्चेचा विषय ठरला आहे. प्रशासन यावर काय पाऊल उचलणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.