निवृत्ती बाबर
Mumbai News: ठाकरे गटाचा अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. माजी नगरसेवक अमेय घोले यांनी राजीनामा दिल्यानंतर आता पदाधिकारी रुपेश मोहिते यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. वडाळा येथील शाखा क्रमांक 178 चे शाखा प्रमुख रुपेश मोहिते यांचा महिला विभाग संघटक श्रद्धा जाधव आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून पदाचा राजीनामा दिला आहे. (Latest Marathi News)
रुपेश मोहिते यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहित महिला विभाग संघटक श्रद्धा जाधव आणि इतर पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. पदावर राहूनही काम करु देत नसल्याचा आरोप मोहिते यांनी केली आहे.
पदाचा राजीनामा दिला तरी संघटनेच काम करतच राहील, अशा आशयाचं पत्र शाखाप्रमुख रुपेश मोहिते यांनी उद्धव ठाकरे यांना लिहलं आहे. माजी नगरसेवक अमेय घोले यांनी देखील श्रद्धा जाधव यांच्यावर आरोप करत शिंदे गटात प्रवेश केला होता.
पदाधिकारी रुपेश मोहिते यांचं पत्र जसेच्या तसं
साहेब, गेली कित्येक वर्षे संघटनेसोबत काम करत असताना, माझ्या कामाची दखल घेत आपण मला वडाळा विधानसभा शाखा क्र. १७८ येथील शाखाप्रमुख पदाची जबाबदारी दिलीत. ही जबाबदारी मी गेली दोन वर्षे प्रामाणिकपणे पार पाडली.
वडाळा विधानसभा मतदारसंघात काम करत असताना महिला विभाग संघटक श्रद्धा जाधव, विधानसभा संघटक राकेश देशमुख, विधानसभा उपविभागप्रमुख रवींद्र घोले व महिला उपविभाग संघटक माधुरी मांजरेकर यांनी अनेक अडचणी निर्माण केल्या. मी संघटनेचा शाखाप्रमुख असून देखील मला कोणतेही अधिकार दिले गेले नाहीत, त्याचप्रमाणे कोणतेही निर्णय घेण्याची मुभा मला नव्हती. (Maharashtra Latest News)
संघटनेतील (मतदारसंघातील) मतभेद दूर व्हावे आणि काम करता यावे म्हणून आमच्या वतीने आम्ही नेहमीच प्रयत्न केला. पण आमचे खच्चीकरण जास्तीत जास्त कसे करता येईल हे प्रयत्न ही मंडळी करत बसली. १७८ या मतदारसंघातील आजी-माजी / ज्येष्ठ वरिष्ठ या पदाधिकाऱ्यांना या मंडळीने कधीच मानसन्मान दिला नाही. आज वडाळा विधानसभेत शाखा क्र. १७८ ही शाखा प्रत्येक बाबतीत पुढे होती, पण ह्याच गोष्टींमुळे माजी नगरसेवक अमेय घोले यांनीही पक्ष सोडला.
या घटनेनंतर सुद्धा प्रामाणिकपणे संघटने सोबतच राहण्याचा निर्णय मी घेतला. यानंतर प्रत्येक वेळेस माझ्याकडे संशयित दृष्टिकोनातूनच पाहिले गेले आणि भर सभेत माझ्यावर अविश्वास दाखवण्यात आला. कदाचित मी संघटने सोबत राहिलो, हाच त्यांच्या दृष्टीने गुन्हा झाला. साहेब, अखेरीस जड अंतःकरणाने मी शिवसेना शाखा क्र. १७८ या शाखाप्रमुख पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. हा माझा राजीनामा आपण स्वीकार करावा ही नम्र विनंती.
पण मी संघटना कदापिही सोडणार नाही, माझी निष्ठा ही नेहमी आपल्या सोबत शेवटपर्यंत असणार आहे आणि पदावर जरी नसलो तरी पक्षाचे काम तसेच चालू ठेवणार आहे.
जय हिंद, जय महाराष्ट्र !!!
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.