शरद पवार यांनी नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या आक्रोश मोर्चातून सरकारवर जोरदार हल्ला चढवला
शेतकऱ्यांची आत्महत्या, कांद्याला न मिळणारा भाव, दुष्काळ व अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचा हल्लाबोल
सरकारने दुर्लक्ष केल्यास आणखी मोठा मोर्चा उभारण्याचा पवारांचा इशारा.
अभिजीत सोनवणे, साम टीव्ही
नाशिक : खासदार शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली. शरद पवारांनी नेपाळचं उदाहरण देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. 'तुम्ही दुर्लक्ष केल्यास आणखी मोठा मोर्चा होईल. देवाभाऊंना विनंती आहे की, आजूबाजूंच्या देशात काय घडतंय एकदा बघावं. नेपाळमध्ये बघा काय झालं, असा सवाल शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला. ते नाशिकमध्ये बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात नाशिकमध्ये आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून काढण्यात आलेल्या मोर्चाचं नेतृत्व शरद पवारांनी केलं. त्यानंतर झालेल्या सभेत शरद पवारांनी राज्य सरकावर टीका केली.
शेतकरी सध्या अस्वस्थ आहे. कधी दुष्काळ, आता अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत आहे. शेतकरी अस्वस्थ, संकटात आहे. संकटातून मार्ग काढण्याची जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकारची आहे. शेतकऱ्यांच्या आक्रोशाकडे ढुंकून बघायला सरकारला वेळ नाही. महाराष्ट्रात २ हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.
शेतकरी जीव का देतो? कशामुळे टोकाची भूमिका घेतो? कारण त्याच्या संकटाच्या काळात सरकार त्याच्या पाठीशी उभं राहत नाही. नाशिकचा कांदा देशात जातो. कांदा विकून चार पैसे मिळाले तर मुलाचं शिक्षण, मुलीचे लग्न करता येईल असा विचार शेतकरी करतो. मात्र आज कांद्याला भाव मिळत नाही.
देवाभाऊ सर्व राज्यात तुम्ही पोस्टर लावले. छत्रपती शिवाजी महाराजांची दर्शन घेतानाचा फोटो लावले. मात्र शिवाजी महाराजांनी दुष्काळ आला. तेव्हा महाराजांनी काय केलं होतं? शिवाजी महाराजांचा आदर्श देवाभाऊ घेतील असे आम्हाला वाटत होतं. मात्र ठिकठिकाणी मोठे मोठे होर्डिंग, मोठे मोठे पोस्टर्स शिवाजी महाराजांचे नाव घेऊन लावले. पण बळीराजाकडे ढुंकून बघायला तयार नाही. असं चित्र असेल तर आपल्याला बघ्याची भूमिका येता येणार नाही.
आम्ही सत्तेचा गैरवापर करत नाही. सरकार दुर्लक्ष करत असेल तर बघायची भूमिका आम्हाला घेता येणार नाही. आजचा नाशिकचा मोर्चा ही सुरुवात आहे. तुम्ही दुर्लक्ष केलं तर हा आक्रोश मोर्चा आणखी मोठा होईल.देवाभाऊंना आमची विनंती आहे की, आजूबाजूच्या देशात काय घडतय एकदा बघा. नेपाळमध्ये बघा काय झालं? शहाणपणा शिकण्याचं काम देवाभाऊ आणि त्यांचे सहकारी करतील. या प्रकारची अपेक्षा आज या ठिकाणी व्यक्त करतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.