अमरावतीत स्कूल बस आणि व्हॅनच्या शुल्कात २५ टक्क्यांची वाढ
वाढत्या पेट्रोल-डिझेल दरांमुळे संघटनेचा निर्णय
हजारो पालकांच्या मासिक खर्चात मोठी वाढ होणार
शाळेची फी आणि इतर खर्चांमुळे पालकांमध्ये नाराजी
प्रशासनाने शुल्कवाढीवर नियंत्रण आणावे, अशी मागणी
School Bus And Van Fee Hike 2026 नव्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच पालकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या सतत वाढणाऱ्या दरांमुळे स्कूल बस आणि व्हॅनच्या मासिक शुल्कात तब्बल २५ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय अमरावती स्कूल बस-व्हॅन चालक-मालक वाहतूक संघटनेने घेतला आहे. या निर्णयामुळे हजारो पालकांच्या मासिक खर्चात मोठी भर पडणार असून विद्यार्थ्यांच्या दैनंदिन प्रवासाचा खर्च अधिक वाढणार आहे.
अमरावती जिल्ह्यात सध्या ८०० हून अधिक स्कूल बस आणि व्हॅन कार्यरत आहेत. शहरासह ग्रामीण भागातील लाखो विद्यार्थी दररोज या वाहनांद्वारे शाळेत ये-जा करतात. अनेक पालक नोकरी आणि व्यवसायामुळे मुलांना स्वतः शाळेत सोडू शकत नसल्याने स्कूल बसवर अवलंबून असतात. मात्र आता वाढलेल्या शुल्कामुळे सर्वसामान्य कुटुंबांचे आर्थिक गणित कोलमडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
वाहतूक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol And Diesel Price Hike) सातत्याने वाढत आहेत. तसेच चालक आणि क्लिनर यांच्या वेतनातही वाढ करावी लागत असल्याने जुन्या शुल्कात सेवा चालवणे कठीण होत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे अखेर मासिक शुल्क वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या निर्णयामुळे पालकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. आधीच शाळेची फी, पुस्तके, गणवेश आणि इतर शैक्षणिक खर्चामुळे आर्थिक ताण वाढला असताना आता वाहतूक शुल्कात झालेली वाढ ही डोकेदुखी ठरत असल्याची प्रतिक्रिया अनेक पालकांनी व्यक्त केली. काही पालकांनी प्रशासनाने या प्रकरणात हस्तक्षेप करून शुल्कवाढीवर नियंत्रण आणावे, अशी मागणी केली आहे. शालेय वाहतूक शुल्कवाढीचा निर्णय आगामी काळात पालक आणि संघटना यांच्यातील चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता असून प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.