शिंदेसेना आणि राष्ट्रवादीने जिल्हा बँक निवडणुकीत भाजपला धक्का दिल्याचं वृत्त
झेडपी निवडणुकीतील राजकीय संघर्षानंतर जिल्हा बँकेत नवी समीकरणे
भाजप आणि मित्रपक्षांमधील अंतर्गत मतभेद पुन्हा चर्चेत.
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीतलेच मित्रपक्षांमध्ये सामना रंगल्याचं पाहायला मिळालं. सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिंदेसेना आणि राष्ट्रवादीनं एकत्र येऊन भाजपला सत्तेपासून दूर ठेवलंय. अध्यक्षपदासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते उदयसिंह पाटील उंडाळकर यांची बिनविरोध अध्यक्षपदी निवड झालीये.
तर शिंदेसेनेचे माजी आमदार दीपक चव्हाण यांची उपाध्यक्षपदी वर्णी लागलीय. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिंदेसेना आणि राष्ट्रवादीनं महायुतीतील मित्रपक्ष भाजपला सत्तेपासून दूर ठेवल्यानं आगामी काळात राजकीय संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. कारण, महायुतीतील नेत्यांनीच याबाबत तसे संकेतच दिलेत.
महायुतीतल्या जिल्हा बँकेतल्या या संघर्षाला झेडपी निवडणुकीची पार्श्वभूमी आहे. भाजपनं शिंदेसेना आणि दादांच्या राष्ट्रवादीला कात्रजचा घाट दाखवत झे़डपीची सत्ता मिळवली होती. त्याचाच वचपा आता शिंदेना आणि राष्ट्रवादीनं काढल्याची चर्चा आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत नेमकं काय घडलं होतं ते पाहूयात.
सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिंदेसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना मतदानापासून रोखण्यात आले होते. तर काही सदस्यांना पोलिसांनी जिल्हा परिषदेच्या गेटवर अडवून ताब्यात घेतले होते. त्यावेळी शिंदेसेनेचे मंत्री शंभूराजे देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांच्यासोबत पोलिसांनी धक्काबुक्की केली होती. या गोंधळात मंत्री शंभूराजे देसाई यांच्या हाताला दुखापत झाली होती. शिंदेसेना आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांना मतदान न करता आल्यामुळे भाजपनं बहुमतासाठी आवश्यक असलेलं संख्याबळ नसतानाही सत्ता मिळवली होती.
शिंदेसेना आणि राष्ट्रवादीनं झेडपी निवडणुकीतला भाजपचा वचपा काढला असला तरी मंत्री गोरेंनी भविष्य़ातल्य़ा संघर्षाचा इशारा दिलाय. सातारा जिल्ह्यातली भाजपची धुरा मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे गेल्यापासून महायुतीत वारंवार संघर्ष पेटल्याचं पुढं आलंय. त्यामुळे पुढच्या काळात मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंच्या माध्यमातून भाजप हा संघर्ष मिटवण्यासाठी प्रयत्न करणार की जिल्ह्यातला महाय़ुतीतला सत्तासंघर्ष असाच सुरू राहणार याची उत्सुकता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.