सातारा : सातारा (satara) जिल्ह्यातील विविध तालुक्यात गेल्या दाेन ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस (rain) पडत आहे. पावसामुळे दुर्गम व डाेंगराळ भागात दरडी काेसळण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे घाट रस्ता बंद हाेण्यासारखे देखील प्रकार घडत आहेत. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी शेखर सिंह (Shekhar Sinh) यांनी जिल्ह्यातील तहसील कार्यालयांत आपत्ती व्यवस्थापन व आपत्ती निवारण कक्षाची स्थापना करण्याचे आदेश दिले हाेते. (satara latest marathi news)
त्याची अंमलबजावणी झालेली आहे. प्रशासन नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पूर्णतः सज्ज असून जिल्ह्यातील नागरिकांनी नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने उद्भवणाऱ्या दुर्घटनांबाबत सूचना देण्याकरिता तसेच अनुषंगिक माहितीसाठी तसेच नागरिकांना मदत हवी असल्यास त्यांनी तहसील कार्यालयांमधील दूरध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच खबरदारीच्या उपायोजना म्हणून एनडीआरएफचे एक पथक आवश्यक त्या साहित्यासह कराड येथे दाखल झाल्याची माहिती प्रशासनाने दिली.
सातारा जिल्हा नियंत्रण कक्ष- 1077
तहसिल कार्यालय, सातारा - 02162 - 230681, भ्रमणध्वनी-9158303900
तहसील कार्यालय, कोरेगाव 02163 - 220240, भ्रमणध्वनी-9545468281
तहसील कार्यालय, जावली-02378 - 285223, भ्रमणध्वनी-9403683444
तहसील कार्यालय, वाई-02167 - 227711, भ्रमणध्वनी-9850030074
तहसील कार्यालय, महाबेश्वर-02168 - 260229, भ्रमणध्वनी-9420125556
तहसील कार्यालय, खंडाळा-02169 - 252128, भ्रमणध्वनी-7030833939
तहसील कार्यालय, फलटण-02166- 222210, भ्रमणध्वनी-7588627304
तहसील कार्यालय, माण-02165 - 220232, भ्रमणध्वनी-9422948008
तहसील कार्यालय, खटाव-02161 - 231238, भ्रमणध्वनी-9850762034
तहसील कार्यालय, कराड-02164 - 222212, भ्रमणध्वनी-7972490968
तहसील कार्यालय, पाटण-02372 - 283022, भ्रमणध्वनी- 7083999900.
नागरिकांनी घ्यावयाची काळजी
कोणत्याही परिस्थितीत पुराच्या पाण्यात प्रवेश करू नका.
नदीपात्राच्या कडेला अथवा धोक्याच्या ठिकाणी वास्तव्यास असल्यास तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हा.
दरड प्रवण भागातील नागरिकांनी सतर्कता बाळगून आवश्यकता भासल्यास सुरक्षित ठिकाणी तात्पुरते स्थलांतरित व्हा.
मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नका.
जुन्या मोडकळीस आलेल्या घरात/इमारतीत आश्रय घेऊ नका.
नदी, नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नका.
अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका.
धोकादायक ठिकाणी अथवा दरड कोसळणाऱ्या ठिकाणी थांबू नका.
तात्काळ मदतकार्य सुरु करावे : ओ. पी. गुप्ता
दरम्यान सातारा जिल्ह्यातील काही भागात चांगला पाऊस पडत आहे. कुठेही अतिवृष्टीमुळे आपत्ती निर्माण झाली तर त्या ठिकाणी प्रशासनाने नागरिकांच्या सहकार्यातून तात्काळ मदतकार्य सुरु करावे असे निर्देश जिल्ह्याचे पालक सचिव ओ. पी. गुप्ता यांनी दिले. जिल्हास्तरीय मान्सून पूर्वतयारी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याकामी आढावा बैठक गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात संपन्न झाली.यावेळी गुप्ता बोलत होते.
या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय मुंगीलवार, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत, महावितरणचे गौतम गायकवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) अर्चना वाघमळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात 172 गावे पूर प्रवण आहेत. या गांवामध्ये भविष्यात पूर परिस्थिती निर्माण होणार नाही यासाठी दिर्घकालीन उपाययोजना कराव्यात, असे निर्देश देवून गुप्ता म्हणाले, रस्त्यांवर दरड कोसळल्याने गावांचा संपर्क तुटतो. यावेळी स्थानिक नागरिकांच्या सहभागाने रस्त्यावरील दरड तात्काळ हटवावी. पेरणी होण्याच्या अगोदर शेतातील पाणी निचरा होण्यासाठी ओढ्या-नाल्यांची साफसफाई करावी. ज्या गावांचे कायमचे पुनर्वसन करावयाचे आहे त्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. त्याचा पाठपुरावा केला जाईल.
पावसाळी हंगामात साथीचे रोग पसरु नयेत म्हणून आरोग्य विभागाने दक्षता घ्यावी. ग्रामपंचायती, शाळा, महाविद्यालयांना ज्या स्त्रोतातून पाणी पुरवठा होते त्या स्त्रोतांची तपासणी करावी. त्याचबरोबर ज्या ठिकाणी पाणी शुद्धीकरण केले जाते त्याचीही तपासणी करावी. अति पावसामुळे नदी व ओढ्यांच्या पुलावरुन पाहणी वाहत असेल तर पुलांवरुन होणारी वाहतूक थांबवावी. विज पुरवठा खंडीत होणार नाही याची महावितरणने खबरदारी घ्यावी. तसेच महावितरण कार्यालयात नागरिकांच्या मदतीसाठी अधिकारी, कर्मचारी यांची 24 तास सेवा लावावी. खंबाटकी घाटातील वाहतूक कोंडी व अपघात टाळण्यासाठी वाहन चालकांना पावसातही रस्ता दिसण्यासाठी ठळक पद्धतीने दिशादर्शक लावावे असेही गुप्तां यांनी नमूद केले.
आपत्ती संदर्भात नागरिकांकडून मदती संदर्भात मागण्या आल्या तर त्या पूर्ण करा, असे निर्देश देवून गुप्ता यांनी जिल्ह्यातील झालेली पेरणी, आत्तापर्यंत झालेला पाऊस, आपत्ती संदर्भात करावयाच्या उपाययोजना, साथ रोग पसरु नये म्हणून औषधसाठ्यांचा आढावाही या बैठकीत घेतला. या बैठकीत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी संभाव्य आपत्ती संदर्भात करावयाच्या उपाययोजनांची सादरीकरणाद्वारे माहिती दिली.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.