सुशील थोरात, अहिल्यानगर प्रतिनिधी
Rohit Pawar political setback : कर्जत नगरपंचायतमध्ये आमदार रोहित पवारांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आलाय. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नगराध्यक्षा उषा राऊत यांच्याविरोधात १७ पैकी १३ नगरसेवकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला. या घटनेमुळे कर्जतच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. रोहित पवार यांच्या गटातील अंतर्गत नाराजी समोर आली आहे.
कर्जत नगरपंचायतीमध्ये सध्या राष्ट्रवादी (शरद पवार गट)चे १२, भाजपचे २ आणि काँग्रेसचे ३ नगरसेवक आहेत. रविवारी रात्री राष्ट्रवादी शरद पवार गटातील ८ आणि काँग्रेसच्या ३ नगरसेवकांनी भाजप नेते आमदार राम शिंदे यांच्यासोबत गुप्त बैठक घेतली. या बैठकीत नगरपंचायतीत खांदेपालट करण्याची रणनीती आखण्यात आली. त्यानुसार, सोमवारी नगरसेवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन अविश्वास ठराव सादर केला.
नगराध्यक्षा उषा राऊत यांच्यावर नगरसेवकांनी गंभीर आरोप केले आहेत. नगरसेवकांना विचारात न घेता एकतर्फी कामकाज करणे, नागरी सुविधांच्या मागणींकडे दुर्लक्ष करणे आणि अडीच वर्षांनंतर ठरल्याप्रमाणे पदाचा राजीनामा न देणे, यामुळे नगरसेवकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. "नागरी सुविधांसाठी मागणी केली तर टाळाटाळ केली जाते," असा आरोपही नगरसेवकांनी केला आहे.
या अविश्वास प्रस्तावामुळे कर्जत नगरपंचायतीत सत्तापालट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला हा मोठा झटका मानला जात आहे. दुसरीकडे, भाजप आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी एकत्र येऊन राष्ट्रवादीच्या अंतर्गत फुटीचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला आहे. या घडामोडींमुळे कर्जतच्या राजकारणात पुढील काही दिवस तणावपूर्ण वातावरण राहण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.