शहाद्यात रसगुल्ल्याच्या डब्यात बोका अडकल्याची घटना
वृंदावन नगरमध्ये पहाटे दरोडेखोर आल्याची भीती
बोक्यामुळे शहादा पोलिसांची तासभर शोधमोहीम
सागर निकवाडे, साम प्रतिनिधी
पहाटेचे साडेतीन वाजले होते, शहाद्यातील वृंदावन नगर शांत झोपेत होते. पण अचानक एका घराचा दरवाजा धडाधड वाजू लागला. गाढ झोपेत असलेल्या घरमालकाला जाग आली आणि काळजाचा ठोकाच चुकला. कोण आहे असा आवाज देण्याऐवजी त्यांनी तात्काळ घरातील आणि बाहेरील दिवे लावले. चोर आल्याच्या भीतीने त्यांनी आरडाओरडा सुरू केला.
त्यांचा आवाज ऐकून शेजारीपाजारीही खडबडून जागे झाले. इतक्यात काय, एकामागून एक इतर घरांचेही दरवाजे जोरजोरात वाजू लागले एकटा चोर नाही, तर सशस्त्र दरोडेखोरांची मोठी टोळीच कॉलनीत घुसली आहे, अशी सर्वांची खात्रीच पटली. संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले. याच कॉलनीत राहणाऱ्या एका शिक्षकाने प्रसंगावधान राखत तातडीने शहादा पोलीस निरीक्षकांना फोन लावला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीसही तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि परिसरात दरोडेखोरांची कसून शोधमोहीम सुरू झाली.
तासभर हा थरार सुरू होता. प्रत्येक जण जीव मुठीत धरून दरोडेखोरांचा शोध घेत होता. अखेर, परिसरातील एका सुरक्षारक्षकाला एका घराच्या दरवाजाला जोरजोरात धडका देणारा दरोडेखोर दिसला आणि त्याला पाहून सगळ्यांच्याच तोंडचे पाणी पळण्याऐवजी पोट धरून हसू फुटले.
झाले असे होते की, दिवाळीचा फराळ संपल्यानंतर एका घराबाहेर रसगुल्ल्याचा रिकामा डबा फेकण्यासाठी ठेवला होता. पहाटे खाण्याच्या शोधात फिरणाऱ्या या बोक्याला गोड वास आला. रसगुल्ल्याच्या आशेने त्याने डब्यात तोंड घातले खरे, पण डब्याचे तोंड लहान असल्याने त्याचे डोके त्यात घट्ट अडकले. डब्यामुळे डोळ्यांवर अंधार दाटला आणि बिचारा बोका प्रचंड घाबरला. या संकटातून सुटका करून घेण्यासाठी तो सैरावैरा धावत सुटला आणि डोक्यात डबा अडकलेल्या अवस्थेतच एका घरापासून दुसऱ्या घराच्या दरवाजांवर जोरजोरात धडका मारू लागला.
त्या धडकांचा आवाज ऐकून नागरिकांना 'दरोडेखोर दरवाजा तोडत आहेत असा भास झाला. अखेर नागरिकांनी डबा कापून त्या बोक्याची सुटका केली. एका बोक्याने अख्ख्या वसाहतीसह पोलिसांचीही चांगलीच फजिती केल्याचे लक्षात येताच, पहाटेच्या त्या दहशतीचे रूपांतर एकाच हास्यकल्लोळात झाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.