पुण्यामध्ये हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. चितेजवळ सापडलेल्या लाकडावरील रक्ताच्या डागावरुन हत्येचा गुन्हा उघडकीस आणण्यास पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी ३ जणांना अटक केली आहे. ही घटना पुणे जिल्ह्यातल्या इंदापूरमधील तावशी गावात घडली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, वालचंदनगर परिसरात असणाऱ्या तावशी गावातील एका स्मशानभूमीत १६ नोव्हेंबरला एक मृतदेह जळत होता. या चितेजवळ पडलेल्या लाकडावर रक्ताचे डाग आढळून आले होते. याबाबतची माहिती गावच्या पोलिस पाटलांनी ग्रामीण पोलिसांना दिली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना देखील चितेजवळ रक्ताचे डाग असलेली लाकडं दिसली.
पोलिस पोहचेपर्यंत मृतदेह पूर्णपणे जळालेला होता. स्मशानभूमीतील लोखंडी जाळीवर पूर्णपणे जळालेली हाडे दिसत होती. तर काही अंतरावर रक्त पडलेले पोलिसांना दिसत होते. रक्ताचे डाग ताजे होते. त्यामुळे हत्या करून या वक्तीचा मृतदेह जाळला असल्याचा पोलिसांना संशय आला. त्यानंतर पोलिसांनी रक्ताचे नमुने घेऊन या घटनेच्या तपासाला सुरूवात केली.
तपासादरम्यान पोलिसांना ही लाकडे एका वखारीमधून आणले असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर फलटण येथील गुणवरे गावातील एका वखारीत पोलिसांनी धाव घेतली. तेव्हा पोलिसांना दादासाहेब मारुती हरिहर (३० वर्षे) आणि त्याचा मित्र विशाल सदाशिव खिलारे (२३ वर्षे , दोघेही रा. गोखळी, ता. फलटण, सातारा) हे अंत्यविधीसाठी लाकडे घेऊन गेली असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.
पोलिसांनी दोघांची देखील कसून चौकशी केली. पोलिसांनी खाकी वर्दी दाखवल्यानंतर दोघांनही हत्येची कबुली दिली. हरिभाऊ धुराजी जगताप (वय ७४, रा. गंगाखेड, जि. परभणी) असे खून झालेल्याचे नाव असल्याची माहिती उघड झाली. नात्यातील एका महिलेकडे हरिभाऊ जगताप वाईट नजरेने बघत असल्याचा संशय आरोपी दादासाहेबला होता. त्यामुळे त्याने मित्र विशाल याच्या मदतीने जगताप यांचा खून करण्याचा प्लॅन केला.
हरिभाऊ जगताप यांना १५ नोव्हेंबर रोजी माण तालुक्यातील सतोबाची यात्रा येथे जाऊ, असे त्यांनी सांगितले. प्रवासात आरोपींनी इंदापूर येथील तावशी गावातील स्मशानभूमीजवळ गाडी थांबवली. तेथे जगताप यांच्या डोक्यात दांडके मारुन त्यांचा खून केला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांनी मृतदेह स्मशानभूमीत जाळून टाकला. आरोपींनी हत्या करून हरिभाऊ जगताप यांचा मृतदेह जाळून टाकला असला तरी देखील पोलिसांनी हत्याचा छडा लावला. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.