BJP’s New Strategy for Local Polls: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपकडून मास्टारप्लान तयार करण्यात आलाय. महाविकास आघाडीच्या स्थानिक पातळीवरील बड्या नेत्यांना भाजपमध्ये येण्याचे खुले आमंत्रण भाजपकडून देण्यात येणार आहे. पक्षात येऊ इच्छिणाऱ्यांना घ्या, पण कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देऊ नका,” असा स्थानिक नेत्यांना भाजपकडून स्पष्ट आदेश देण्यात आलाय.
कोकण आणि ठाणे विभागाच्या बैठकीत ही रणनीती ठरवण्यात आल्याचे समोर आलेय. भाजपची लक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांना ‘मिनी विधानसभा’प्रमाणे गांभीर्याने घेऊन विजय मिळवण्यावर आहे. त्यासाठी मविआच्या नेत्यांना फोडण्याची शक्यता आहे. आगामी काही दिवसांत भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश होऊ शकतात. वसई-विरार, नवी मुंबई, ठाणे, सिंधुदुर्गसारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाजपमध्ये इनकमिंग होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
महाराष्ट्रात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे एक प्रकारे मिनी विधानसभा समजल्या जातात. विशेषतः महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या यामधून होणाऱ्या या निवडणुका केवळ स्थानिक मुद्द्यांपुरत्या मर्यादित राहत नाहीत, तर त्या राज्यातील आगामी विधानसभेच्या किंवा लोकसभेच्या राजकीय समिकरणांवरही परिणाम घडवू शकतात. भाजपने याच संदर्भाने लक्षात घेऊन महाराष्ट्रातील विभागात एक निर्णायक बैठक घेतली असून, यामध्ये एक स्पष्ट आणि आक्रमक रणनीती स्वीकारली आहे.
भाजपने या बैठकीत निर्णय घेतला की, महाविकास आघाडीतील स्थानिक पातळीवरील प्रभावशाली नेते जर पक्षात येण्यास इच्छूक असतील, तर त्यांना प्रवेश दिला जाईल. अर्थात, यामागे स्पष्ट राजकीय हिशेब आहे. स्थानिक नेत्यांचे व्यक्तिगत मतदारसंघांमधील वर्चस्व भाजपला या निवडणुकांमध्ये मोठं यश मिळवून देऊ शकतं. या निर्णयामध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भाजपमध्ये घेताना आपल्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही, याची खबरदारी घ्या ह्या शब्दांत पक्षश्रेष्ठींनी आपल्या स्थानिक नेत्यांना स्पष्ट सूचना दिली आहे. त्यामुळे भाजप स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचा विरोध टाळत योग्य संतुलन साधण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, यामुळे भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाला, तर त्याचा परिणामही दूरगामी ठरू शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.