Parbhani News : परभणीच्या (Parbhani) पूर्णा तालुक्यातील माहेर गावात ग्रामस्थांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याने ग्रामस्थांनी संपूर्ण गावच (Village) विक्रीला काढला आहे. ५०० लोकसंख्या असलेल्या या गावात अनेक प्रकारच्या मूलभूत सुविधा नाहीत. शाळकरी मुलांना शाळेत जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. मुलांना रोज चिखलातून वाट काढत पाण्यातून शाळेत जावं लागतंय. ग्रामस्थांनी अनेकवेळा रस्त्या संदर्भात शासनाकडे निवेदने दिली. परंतु शासनकर्ते आणि लोकप्रतिनींच्या दुर्लक्षतेमुळे गावकरी मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याने गावकऱ्यांनी हे गावच विक्रीला काढलं आहे.
पूर्णा तालुक्यातील माहेर हे ५०० लोकसंख्या असलेले छोटे गाव आहे. हे गाव ताडकळस ते पालम राज्य रस्त्यावर पश्चिमेस साडेतीन कि.मी अंतरावर आहे. मात्र या गावाला इतर गावाशी, मुख्यालयाशी तालुका आणि जिल्हा जोडणारा दळणवळणासाठीचा पक्का रस्ता नाही. १६ वर्षापूर्वी म्हणजेच २००५ मध्ये जिल्हा परिषदेच्या वतीने या रस्त्याचे खोदकाम व मातीकाम करण्यात आले होते.
त्यानंतर या रस्त्याचे पूर्णा तालुक्यातील माहेर पाटीपासून ते गावापर्यंतचा ३ किमीपर्यंतचा रस्ता तयार करण्यात यावा, या मागणीसाठी उपोषणास बसलेल्या ग्रामस्थांना जिल्हाधिकारी व गावास भेट देण्यास आलेले जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आश्वासन दिले. त्यानंतर या रस्त्यावर कच्चे खडक टाकण्यात आले. मात्र, रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही.
सध्यस्थितीत बानेगाव थांबा ते माहेर ३ किमी रस्त्यावर ८ महिने २-३ फूट चिखल राहतो. या चिखलातून ग्रामस्थांना तालुका,जिल्हाचे ठिकाणी गाठण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. तसेच गरोदर मातांना,रुग्णांना, वृध्दांना रूग्णालयात नेणे अवघड झाले आहे. मागील वर्षी शालेय पोषण आहाराचा ट्रक रस्त्याअभावी वापस गेल्याने सर्व तालुक्यासह जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचा फौज फाटाने गाव गाठले.
विशेष म्हणजे तहसीलदार,गटविकास अधिकारी यांना आपल्या गाड्या सोडून पायीच गाव गाठावे लागले होते. त्यावेळी लवकरात लवकर रस्त्याचे काम मार्गी लावू, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र या घटनेला एका वर्षाचा कालावधी पूर्ण होऊन ही अद्याप गावकऱ्यांच्या रस्त्याचा प्रश्न मिटला नाही.
त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी २५ सप्टेंबर पर्यंत रस्त्याचा प्रश्न मार्गी नाही लागला तर गाव,घर,शेतीबाडीसह बोलीव्दारे विक्री काढणार आहोत. अशा अशयाचे निवेदन २२ सप्टेंबर रोजी तहसीलदार पल्लवी टेमकर यांना देण्यात आले आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.