पंढरपूर येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय कार्यान्वित करण्यास शासनाची मंजुरी
सात तालुक्यांचा नव्या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात समावेश
सोलापूर अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी आणि अक्कलकोट हे चार तालुके राहणार आहेत.
महाराष्ट्र सरकार आणखी एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. राज्यातील जिल्ह्यांची संख्या वाढणार आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून हालचाली सुरू केल्या आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार राज्यात ३७ जिल्हे होणार असून ३७ वा जिल्हा पंढरपूर असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पंढरपूरला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा देण्यासाठी राज्य सरकारकडून हालचाली सुरू झाल्या आहेत.
प्रशासनाने पंढरपूर येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालयाला मंजुरी दिली आहे. या नव्या कार्यालयाच्या माध्यमातून पंढरपूरसह ७ तालुक्यांचा प्रशासकीय कारभार हाताळला जाणार आहे. पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, माढा, माळशिरस, करमाळा आणि मोहोळ या ७ तालुक्यांचा कारभार या अपर जिल्हाधिकारी कार्यालयातून होणार आहे. पंढरपूर परिसरातील नागरिकांना प्रशासकीय कामांसाठी सोलापूर जिल्ह्याच्या मुख्यालयात जावे लागते.
त्यामुळे स्वतंत्र प्रशासकीय कार्यालयाची स्थापना झाल्यास स्थानिक पातळीवरील प्रशासकीय कामांना अधिक गती मिळण्याची शक्यता आहे. तर सोलापूर अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी आणि अक्कलकोट हे चार तालुके राहतील. नवीन कार्यालयासाठी अप्पर जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांची पदस्थापना शासनस्तरावरून करण्यात येणार आहे.
इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांची पदस्थापना जिल्हाधिकारी करतील. सुरुवातीला तात्पुरती जागा निश्चित करून कार्यालय सुरू करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यानंतर कायमस्वरूपी जागा शोधून कार्यालयाच्या बांधकामाचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे निर्देश आहेत. या कार्यवाहीचा १५ दिवसांत शासनाला अहवाल सादर करावा लागणार. तरी या प्रस्तावांच्या बाबत मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राज्याचे महसूल सचिव विकास खारगे यांची भेट घेत पंढरपूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर करण्याबाबत त्वरित शासन निर्णय जाहीर करण्याचे सांगितले.
अनेक वर्षांपासून पंढरपूरला स्वतंत्र जिल्हा करण्याची मागणी केली जातेय. आता अपर जिल्हाधिकारी कार्यालयाला मंजुरी मिळाल्याने या मागणीला बळ मिळेल अशी चर्चा सुरू झालीय. मात्र पंढरपूरला स्वतंत्र जिल्हा म्हणून अधिकृत घोषणा झालेली आहे का, याबाबत अंतिम शासन निर्णयाची माहिती महत्त्वाची ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.