~ विनोद जिरे
बीड - ओबीसींच्या आरक्षणावरून राज्यभर आंदोलन झाल्यानंतर पुन्हा एकदा ओबीसींची जनजागृती करण्यासाठी समता परिषदेने विभागनिहाय शिबिरांचे आयोजन केले आहे. राज्यातील पहिले शिबीर हे आज बीडमध्ये पार पडले. यावेळी जेष्ठ विचारवंत हरी नरके आणि उत्तम कांबळे यांनी ओबीसी समाजातील मागासलेपणा आणि विषमता यावर प्रखर मार्गदर्शन केले. यावेळी मोदी सरकार, देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे आणि ओबीसी मंत्र्यांविषयी तुफानफटकेबाजी केली.
केंद्र सरकारने ओबीसी आरक्षण रद्द केल्यानंतर, ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात आक्रमक झाला आहे. अनेक ठिकाणी रास्ता रोको, चक्का जाम आंदोलन होत आहेत. मात्र याचे कोणतेच सोयरसुतक केंद्र सरकारला नसल्याने, समता परिषदेने पुन्हा एकदा ओबीसीची वज्रमुठ आवळण्याचा निर्धार, ओबीसी जनजागृती शिबिराच्या माध्यमातून केला. या शिबिराला जेष्ठ विचारवंत हरी नरके यांनी मार्गदर्शन केले. यावेळी हरी नरके म्हणाले, केंद्र सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षण रद्द केल्याने, राज्यातील 28 हजार ग्रामपंचायत, 360 नगरपालिका, 27 महानगरपालिका, 34 जिल्हा परिषदमधील 56 हजार लोकांना एका निकालाने फटका बसला आहे.
हे देखील पहा -
खरं म्हणजे गोपीनाथ मुंडेंनी 2010 साली ओबीसी जनगणनेला संसदेमध्ये जाहीरपणे पाठिंबा दिला होता. त्याची किंमत त्यांच्या पक्षामध्ये मोजली आणि म्हणून पंकजा मुंडे जशा नाव लावतात पंकजा गोपीनाथ मुंडे तसा त्यांनी मुंडे साहेबांचा वारसा देखील जपला पाहिजे. केवळ पक्षाचा आदेश आहे म्हणून पंकजा मुंडेंनी घुमजाव करून, आता आम्हाला जनगणना नको फक्त इमेंरिअल डेटा पाहिजे आणि तो राज्य सरकारने मिळवावा केंद्राकडून मागू नये. अशी दिशाभूल पंकजा मुंडेंनी करू नये. सत्तेत असताना एक भूमिका आणि विरोधात असताना दुसरी भूमिका हे बरोबर नाही.
पुढे बोलताना नरके म्हणाले, देवेंद्र फडणवीस ओबीसींचा पुळका असल्यासारखं का वागतात. कारण त्यांच्या मतदार संघात 75 ते 80 टक्के ओबीसी आहेत. त्यातील जवळपास 40 टक्के माझ्या संपर्कातील आहेत. त्यामुळं त्यांना माझं एक आव्हान आहे. देवेंद्र भाऊ तुम्ही जर चर्चा करायला सामोरासमोर येत नसाल. तर मी तुमच्या मतदारसंघांमध्ये येऊन सभा घेतो. आणि वस्ती वस्ती मध्ये जाऊन तुमच्या लबाड्या एक्सपोज करतो. मोदी आणि तुम्ही कशा स्वरूपात लोकांना फसवत आहेत, हे देखील सांगतो. असं खुलं आव्हान यावेळी ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांनी फडणवीसांना केले.
आरएसएसचा आरक्षणाला विरोध आहे कारण की त्यांचा हा एक कलमी कार्यक्रम आहे. तो म्हणजे आरक्षण मुक्त भारत. अत्यंत लबाड खोटं बोलण्याचं त्यांच्याकडं प्रशिक्षण असतं. असा गंभीर आरोप देखील यावेळी हरी नरके यांनी केला. तर याचं प्रशिक्षण घेतलेले देवेंद्र फडणवीस यांच्या इतका खोटा बोलणारा मुख्यमंत्री या महाराष्ट्रामध्ये झाला नाही अशी घणाघाती टीका देखील त्यांनी फडणवीसांवर केली. महाराष्ट्रातील आजपर्यंतच्या सगळ्या मुख्यमंत्र्यांनी मिळून जेवढं खोटं बोललं असेल ना, त्यांच्यापेक्षा शंभर पटीने जास्त फडणवीस खोटे बोलले आहेत. म्हणजे देवेंद्र ऐवजी खोटेद्र असच नाव यांचा ठेवलं पाहिजे. अशी सडकून टीका देखील यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणावरून केली.
तर यावेळी ज्येष्ठ विचारवंत उत्तम कांबळे यांनी देखील सणसणीत टीका आजच्या व्यवस्थेवर केली. ते म्हणाले की "मूठभर लोक धावले म्हणजे भारत दौड रहा है" असं आहे का ? भारतात सर्वात पहिला नेता महात्मा फुले आहेत. त्यांनी राजकारण, शिक्षण, नोकरी याविषयी मार्गदर्शन केले. आज एक्टिंग पासून ते प्लॅनिंग पर्यंतच्या जागा मोजक्या समाजाच्या हातात आहेत. देशात 10 हजार जाती असतील. तर तेवढ्या जातीतील एका एका व्यक्तीला प्रतिनिधी म्हणून यायला पाहिजे. महाराष्ट्रात 70 मंत्री असतील तर ते 70 जातीतील असायला हवेत. केंद्रात 100 मंत्री आहेत तर ते शंभर जातीतील असायला हवेत. मात्र दुर्दैव आहे की महाराष्ट्रात 16 आणि केंद्रात 20 जातीचे लोक आहेत. त्यामुळे बाकीच्या जातींना प्रतिनिधित्व का नाही ? असा सवाल देखील यावेळी उत्तम कांबळे यांनी उपस्थित केला आहे.
देशाचे ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली आम्ही राज्यात विभागस्तरावर ओबीसींच्या जनजागृती शिबीराचे आयोजन केले आहे. राज्यातील पहिले शिबिर हे बीडमध्ये झालं असून समाजातील बांधवांना आरक्षणाचं, मागासलेपणाचं महत्व पटवून देण्यासाठी या शिबिराचे आयोजन केले आहे. याला उस्फुर्त असा प्रतिसाद मिळाला असून आठ जिल्ह्यातून ओबीसी समाजातील विविध संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यासह कार्यकर्त्यांनी याठिकाणी उपस्थिती दर्शविल्याचं आयोजक सुभाष राऊत यांनी सांगितलं.
दरम्यान बीडमधील या शिबिराच्या माध्यमातून पुन्हा एकदा राज्यात ओबीसीची वज्रमुठ आवळणार असून यामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीपूर्वी ओबीसींच्या आरक्षणाचा तिढा सुटला नाही. तर मोठा संघर्ष पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Edited By : Krushnarav Sathe
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.