अजय सोनवणे, साम टीव्ही
नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसंत परिसरात जमीन वादातून धक्कादायक प्रकार समोर आला असून, कोर्टाने स्थगिती दिलेल्या जमिनीवर जबरदस्तीने शेती नांगरण्याचा प्रयत्न करत महिलांसह कुटुंबीयांना ट्रॅक्टरखाली चिरडून जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळगाव बसंत येथील अजय गोसावी यांच्या भावकीमध्ये जमीन वाद सुरू असून संबंधित प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालयाने या वादग्रस्त जमिनीवर स्थगिती आदेश दिलेला असतानाही ऋषिकेश निखिल गोसावी, अभिषेक निनाद गोसावी व इतर पाच जणांनी भाड्याने ट्रॅक्टर आणून संबंधित जमीन नांगरण्यास सुरुवात केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ही बाब लक्षात आल्यानंतर अजय गोसावी, रश्मी अजय गोसावी आणि सुवर्णा सुभाष गोसावी हे ट्रॅक्टर चालकाला विचारपूस करण्यासाठी गेले असता, ट्रॅक्टर चालकाने त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेत रश्मी अजय गोसावी आणि सुवर्णा सुभाष गोसावी या जखमी झाल्या असून त्यांच्यावर पिंपळगाव येथील राधाकृष्ण हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
विशेष म्हणजे जखमींची प्रकृती गंभीर असतानाही पोलिसांनी आरोपींवर अत्यंत हलक्या स्वरूपाचे गुन्हे दाखल केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. न्यायालयाचा स्थगिती आदेश असतानाही संबंधितांकडून जमिनीवर जबरदस्तीने प्रवेश करण्यात आला, महिलांच्या जीवाशी खेळ करण्यात आला, तरीही कठोर कारवाई का करण्यात आली नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत आहे का? पोलीस कोणाच्या दबावाखाली काम करत आहेत का? असे गंभीर प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहेत.जखमी महिलांना न्याय मिळावा, जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कलमांखाली गुन्हे दाखल व्हावेत आणि संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.