नाशिक शहराच्या श्वासात अडथळा ठरणाऱ्या द्वारका चौकाच्या वाहतूक कोंडीवर अखेर कायमस्वरूपी तोडगा निघाला. आगामी कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या द्वारका चौक सुधार प्रकल्पाला २१४ कोटी रुपयांची केंद्रीय मंजुरी मिळालीय. या प्रकल्पासाठी खासदार राजाभाऊ वाजे यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता.
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी स्वतः सोशल मीडियावरून या निर्णयाची घोषणा केली आहे. नाशिक शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी द्वारका चौकाच्या सुधारणेस मंजुरी देण्यात आल्याची त्यांनी जाहीर केले आहे. द्वारका चौक हा नाशिकमधील केवळ एक वाहतूक चौक नसून, मुंबई–आग्रा राष्ट्रीय महामार्ग, नाशिक रोड, पंचवटी, शहराचा मध्यभाग आहे. औद्योगिक क्षेत्रांना जोडणारा हा मुख्य श्वासमार्ग आहे.
वाढती लोकसंख्या, वाहनांची प्रचंड संख्या आणि अपुऱ्या पायाभूत सुविधा यामुळे या चौकात वाहतूक कोंडी होत असते. याच पार्श्वभूमीवर खासदार राजाभाऊ वाजे यांनी सिग्नल-फ्री वाहतूक, भुयारी मार्ग (अंडरपास), वापरात नसलेल्या पादचारी सबवेचे वाहन अंडरपासमध्ये रूपांतर, कुंभमेळ्यासाठी दीर्घकालीन वाहतूक आराखडा या मागण्यांसाठी वेगवेगळ्या टप्प्यांत सातत्याने पत्रव्यवहार, तांत्रिक मांडणी केल्या. यासाठी केंद्रीय मंत्र्यांसोबत प्रत्यक्ष भेटी घेतल्या.
२०२७ मध्ये नाशिकमध्ये होणारा कुंभमेळा हा केवळ धार्मिक नव्हे, तर प्रशासनिक आणि पायाभूत सुविधांची कसोटी असणार आहे. कोट्यवधी भाविक, वाहनांची प्रचंड गर्दी आणि मालवाहतुकीचा ताण लक्षात घेता, द्वारका चौकाचा प्रश्न सोडवणे गरजेचे होते.
केंद्र सरकारने या वास्तवाची दखल घेत, २१४ कोटींच्या भरीव तरतुदीसह प्रकल्पास मंजुरी दिली. या प्रकल्पामुळे शहरातील वाहतूक सुरळीत होईल, सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम बनेल आणि मालवाहतुकीचा वेळ व खर्च कमी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
नाशिकसाठी केवळ प्रकल्प नव्हे तर दिशादर्शक निर्णय द्वारका चौक प्रकल्प ही केवळ एक विकास योजना नसून, नाशिक शहराच्या भविष्यातील नियोजनाची दिशा ठरवणारा निर्णय मानला जात आहे. धार्मिक, औद्योगिक आणि कृषी केंद्र असलेल्या नाशिकसाठी हा प्रकल्प ‘गेम चेंजर’ ठरणार आहे. निवडून आल्यापासून माझ्या अजेंड्यावर असलेला हा प्रश्न मार्गी लागतोय याचा आनंद आहे.
नितीन गडकरी याबाबत सकारात्मक होतेच, थोडा उशीर झाला असला तरी प्रकल्प होतोय हे महत्वाचे. बाकी फक्त द्वारका चौकाचा प्रश्न मिटतोय म्हणून मी समाधानी नाही, अशी प्रतिक्रिया खासदार राजाभाऊ वाजे यांनी प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.