सागर निकवाडे
नंदुरबार : पुरुष किंवा महिलांचे सलून, ब्युटी पार्लर ऐकलं असेल बघितलं आहे. मात्र बैलांच ब्युटी पार्लर बघितलं किंवा ऐकलं आहे का?, नाही ना पण हो हे खर आहे. कारण सातपुड्यात एक अनोखे बुल ब्युटी पार्लर असून बुल ब्युटी पार्लर म्हणून ओळख असलेल्या बद्रीझिरा गावात बंजारा समाजाच्या महिला बैलांचा श्रुंगार तयार करत असतात. याला शेकडो वर्षांची परंपरा देखील आहे.
विविध सौंदर्य प्रसाधनांचा उपयोग करून शरीर, चेहरा सजविण्याची कला मानवाला लाभली आहे. ही कला मानवी जीवनात केवळ सजून- धजून राहण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर जागतिकीकरणाच्या प्रवाहात ‘ब्युटी पार्लर’ या वैश्विक नावाने ही कला जगातील खेड्यापाड्यात देखील मुरली आहे. कोणतेही शहर अथवा खेडेगाव असे नाही; जेथे आज महिला व पुरुषांसाठी ब्युटीपार्लर नाही. एखाद्या निमित्ताने मुले-मुली,तरुण-तरुणी, स्री-पुरुषांनी सजणे व त्यासाठी जागोजागी ब्युटी पार्लर असणे यात कुठलेही नाविन्य उरलेले नाही. परंतु खास बैलांचे ब्युटी पार्लर हे ऐकायला नवीनच आहे.
देशातल्या गावागावात आणि घराघरात पोळा हा सण श्रावणी अमावस्येला बैलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील बंद्रिझिरा गावातल्या घराघरात बैल सजविण्यासाठी लागणाऱ्या लोकरीच्या रंगीबेरंगी गोंड्यांची आणि बैलांच्या साज, सजावटीची साधने, प्रसाधने बंजारा समाज बांधव वर्षानुवर्षांपासून करत आले आहेत. पोळ्याच्या पार्श्वभूमीवर बंद्रिझिरातल्या रस्तोरस्ती विविधरंगी गोंड्यांचे दर्शनाने गावाचे सौंदर्य अक्षरशः खुललेले असते.
गावातील घराघरात बनविला जातो साज
सातपुडा पर्वतरांगेत वसलेल्या नंदुरबार शहरापासून अवघ्या दहा किलोमीटरवर असलेल्या बंद्रिझिरा या गावाची ओळख वेगळी आहे. बैल आणि पशु सजविण्यासाठी लागणाऱ्या लोकरीच्या रंगीबेरंगी गोंड्यांची आणि पूरक साहित्य- साजाची निर्मिती या ठिकाणी घराघरात केली जाते. अनेक पिढ्यांपासून अव्याहतपणे चालत आलेल्या या परंपारिक व्यवसायाला किती वर्षांची परंपरा आहे; याबाबत अधिकृत कुठेही नोंद नाही. गावातील बुजुर्गांकडून दोन-तीन पिढ्यांपासूनचे संदर्भ मिळतात. परंपरागतपणे गोंडे, साज तयार करण्याच्या व्यवसायामुळे ‘गोंडेवाला बंद्रिझिरा’ अशी गावाची ओळख बनली आहे.
महाराष्ट्रासह अन्य राज्यातही गावाची ख्याती
बंद्रीझिरा गावाच्या बंजारा समाजातील महिला कुटुंबातील सदस्य पोळा सणाची चाहूल लागली की आपल्या कारागीरीत गढून जातात. या गोंड्यांनी आणि साजाने जिल्ह्याची, राज्याची सीमा कधीच पार केली असून महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेश व राजस्थान राज्यांतील अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांची ख्याती पसरलेली आहे. मध्यप्रदेशातील शेती औजारांसाठी देशभर प्रसिद्ध असलेली खेतिया येथील बाजारपेठ बंद्रीझिराच्या पशु सजावटीच्या वस्तूंनी सजलेली असते.
असा सजविला जातो बैलांना साज
शेतात ज्या बैलजोडीकडून आपल्या उदरनिर्वाहाची कामे करवून घेतली जातात, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलांना पोळ्याच्या दिवशी सकाळपासून रानात चरायला सोडतात. त्यांना अंघोळ घालून घरी आणल्यावर सजवले जाते. बैलांच्या शिंगांना रंग लावतात. जुन्या ‘नाथां’ना काढून नवीन ‘नाथ’ बैलांच्या नाकात ओवली जाते. गोंडे, आरसे, पायात तोडे, गळ्यांत घागरमाळा, चंग, गेठा, घोगर, घण्टी, पितळाची साकळी, शिंगाला फुगे, कणकेचे शेंगाळे, फुले, पायाला केसारी, तोडे, पाठींवर लोकरेपासूनबनवलेली मखमली झुल, माथोटी, दोर लावले जातात. बैलांच्या डोळ्यांत सुरमा भरला जातो. रूईच्या फुलांच्या माळादेखील घातल्या जातात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.