Nanded Pakistani Beauty Products Update : नांदेडमधील पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनांच्या जप्ती प्रकरणाला आता गंभीर आणि वेगळे वळण लागले आहे. सुरुवातीला फक्त अवैध सौंदर्यप्रसाधनांची विक्री वाटणारा हा गुन्हा आता थेट दहशतवाद्यांसोबत जोडला जाण्याची शक्यता निर्माण झाली. या प्रकरणात एटीएस आणि EOW आर्थिक गुन्हे शाखेची एन्ट्री होण्याची शक्यता आहे. चेहरा गोरा करण्याचा दावा करणाऱ्या भारतात बंदी असणाऱ्या पाकिस्तानी क्रीममागे दहशतवाद्यांचा काळा हात तर नाही ना? याचा संशय व्यक्त केला जात आहे.
नांदेड शहरातील मन्यार गल्लीमध्ये ट्रॅव्हलिंग बिझनेसच्या नावाखाली थेट पाकिस्तानातून आयात केलेली तब्बल ६० लाख रुपयांची ३८ प्रकारची प्रतिबंधित सौंदर्यप्रसाधने जप्त करण्यात आली होती. केंद्र सरकारची बंदी असतानाही हा मेड इन पाकिस्तान माल नांदेडमध्ये आला कुठून, या प्रश्नाने तपास यंत्रणांचे कान टोकारले आहेत.
या सौंदर्यप्रसाधनांच्या विक्रीतून मिळणारा पैसा थेट दहशतवादी कारवायांसाठी (Terror Funding) वापरला जात होता का, असा संशय आता बळावला आहे. प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय धागेदोरे आणि राष्ट्रीय सुरक्षेचा अँगल लक्षात घेता, या संपूर्ण रॅकेटचा आणि मुख्य सूत्रधाराचा पर्दाफाश करण्यासाठी आता दहशतवाद विरोधी पथकाची (ATS) आणि आर्थिक गुन्हे शाखेची (EOW) एन्ट्री झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आरोपी मोहम्मद जियाऊद्दीनच्या अटकेनंतर आता अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.
ज्या उत्पादनांवर जगभरात बंदी आहे, ती आपल्या देशात उघडपणे वापरली जातात हे काही गुपित राहिलेले नाही. जर बंदी असलेली पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधने नांदेडमध्ये विकली जात असतील, तर सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेले केंद्र सरकार काय करत आहे? सरकार झोपले आहे का? अशा उत्पादनांनी देशात प्रवेश करून लोकांच्या आरोग्याला हानी पोहोचवावी अशी सरकारची इच्छा आहे का?- नाना पटोले, काँग्रेस नेते
ही सौंदर्यप्रसाधने नेमकी आली कुठून?
या ६० लाख किंमतीच्या सौंदर्यप्रसाधनांची कोणतीही वैध कागदपत्रे किंवा बिलं उपलब्ध नव्हती. याप्रकरणी पोलिसांनी गोदामाच्या मालकाला आणि संबंधित दुकानदारांना अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या मोठ्या कारवाईमुळे संपूर्ण नांदेड जिल्ह्यात आणि व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे. मोहम्मद जियाऊद्दीन मोहम्मद बाजीद (वय २५, रा. मन्यार गल्ली, ह.मु. हैदरबाग, देगलूर नाका, नांदेड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात दहशतवादी अँगल आहे का? पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनांची विक्री केलेला पैसा कुठे वापरला जात होता? ही सौंदर्यप्रसाधने नेमकी आली कुठून? यामध्ये आणखी कुणाचा सहभाग आहे? दहशतवाद कटाचा हा भाग आहे का? याचा तपास केला जाणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.
नांदेडमध्ये नेमकं काय झालं? संशय का बळावला ?
नांदेड पोलिसांनी अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी अशोक राठोड यांना सोबत घेऊन गुरुवारी रात्री अचानक छापा टाकला. या कारवाईत थेट मेड इन पाकिस्तान सौंदर्यप्रसाधने जप्त करण्यात आली. केंद्र सरकारने पाकिस्तानातून कोणत्याही मालाच्या आयातीवर बंदी घातलेली आहे. पण ही मेड इन पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधने नेमकी आली कुठून? असा सवाल उपस्थित झाला अन् दहशतवादी अँगल पुढे आला.
आता एटीएस आणि आर्थिक गुन्हे शाखेमार्फत तपास केला जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. जप्त करण्यात आलेल्या मालाची पाहणी करून आंतरराष्ट्रीय धागेदोरे असलेल्या या बेकायदेशीर रॅकेटच्या मुळाशी जाण्याचे आणि यामागील मुख्य सूत्रधार (मास्टरमाईंड) कोण आहे, याचा कसून शोध घेण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.