(संजय डाफ)
नागपुरात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसानं हाहाकार माजवला होता. या पुरात जवळपास १ हजार घरांचं नुकसान झालं. तर कोट्यवधींचं नुकसान झालं. काल आणि आज पावसानं विश्रांती घेतल्यानं नागपूरमधील जनजीवन पूर्वपदावर आले आहे. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्त भागांची पाहणी केली असून तातडीने मदत करण्याचे आदेश त्यांनी दिलेत.(Latest News)
शुक्रवारी मध्यरात्री नागपुरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. यामुळे शहरात हाहाकार माजला होता. फक्त ४ तासात तब्बल १०९ मिलिमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली. या मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलाव, नागनदी आणि इतर नाले ओव्हरफ्लो झाले आणि त्याचं पाणी शहरातील बऱ्याच भागात घुसलं. यामुळे शहरात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती.
अंबाझरी, डागा लेआऊट, शंकर नगर या भागातील पुरात अडकलेल्या नागरिकांच्या बचावासाठी सैन्याच्या तुकड्या, केंद्रीय राखीव दल आणि राज्य राखीव दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आलं होतं. या जवानांच्या मदतीने जवळपास ४०० नागरिकांना रेस्क्यू करण्यात आलं.
या पुरात दुर्दैवाने वेगवेगळ्या ठिकाणी ३ महिलांचा मृत्यू झाला. तर १४ जनावरे वाहून गेली. घराचं, दुकानांचं, वाहनांचं नुकसान झालं असून राज्य सरकार नुकसान झालेल्या नागरिकांना १० हजार रुपयांची मदत करणार आहे. काल सकाळपासून पाऊस थांबल्याने दुपारी पूर ओसरला आणि जनजीवन सामान्य झालं. आज या सर्व पूरग्रस्त भागातील परिस्थिती सामान्य झाली असून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करत पाहणी केली.
अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो परिसरात सोंदर्यीकरणामुळं आणि २५ वर्षांपूर्वी ओव्हरफ्लोचे पाणी वाहून जाणाऱ्या नाल्यावर स्केटिंग फ्लोअर बांधल्याने पाणी वस्त्यांमध्ये शिरले. खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. तेवढ्या क्षमतेच्या ड्रेनेज सिस्टीम नसल्याने पावसाचे पाणी वाहून जायला उशीर लागला. त्यामुळं यासंदर्भात उपाययोजना करण्याच्या सुचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.