Maharashtra ST 200 new Volvo buses long distance service saam tv
महाराष्ट्र

खासगी बसला ST ची दमदार टक्कर! 200 व्होल्वो बसेस, ऑनलाइन बुकिंग अन् शयनयानाची सुविधा

MSRTC 200 Volvo Buses Latest News In Maharashtra: खासगी आराम बससेवेला टक्कर देण्यासाठी एसटी महामंडळाच्या ताफ्यात २०० अत्याधुनिक वातानुकूलित व्होल्वो बसेस दाखल होणार असून ऑनलाइन बुकिंगसह प्रवाशांना आधुनिक सुविधा मिळणार आहे.

Omkar Sonawane

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागापासून शहरांपर्यंत सर्वसामान्यांची विश्वासार्ह लोकवाहिनी असलेल्या एसटी महामंडळाने आता लांब पल्ल्याच्या आरामदायी प्रवासाच्या क्षेत्रातही नवी झेप घेण्याची तयारी केली आहे. खासगी आराम बससेवांकडे वळणाऱ्या प्रवाशांना एसटीकडे आकर्षित करण्यासाठी लवकरच महामंडळाच्या ताफ्यात स्वमालकीच्या २०० अत्याधुनिक, वातानुकूलित व्होल्वो बसेस दाखल करण्यात येणार आहेत. यामध्ये १७० आसनी आणि ३० शयनयान बसेसचा समावेश असून, सुरक्षितता, आरामदायीपणा, आधुनिक तंत्रज्ञान आणि दर्जेदार प्रवासी सेवेचा संगम या नव्या सेवेत पाहायला मिळणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच एसटी महामंडळाच्या टप्प्यामध्ये व्हल्वो बसेस समाविष्ट होत आहेत.

सरनाईक म्हणाले की, लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी सध्या अनेक प्रवासी अधिक भाडे देऊन खासगी आराम बससेवेला पसंती देतात. वातानुकूलित सुविधा, आरामदायी आसनव्यवस्था, कमी प्रवास वेळ आणि रात्रीच्या प्रवासातील सुविधा यामुळे खासगी आराम बससेवेचा स्वतंत्र प्रवासी वर्ग निर्माण झाला आहे. या प्रवाशांना एसटीकडे आकर्षित करण्यासाठी केवळ पर्याय उपलब्ध करून न देता खासगी आराम बससेवेच्या तोडीची आधुनिक, विश्वासार्ह आणि प्रवाशांच्या अपेक्षा पूर्ण करणारी सेवा देण्याचे उद्दिष्ट एसटीने ठेवले आहे.

दिवसा आरामदायी प्रवास, रात्री शयनयानाची सुविधा

२५० किलोमीटरपेक्षा अधिक अंतराच्या किमान पाच ते सहा तासांच्या प्रवासासाठी आरामदायी ४५ आसनी बसेस, तर रात्रीच्या लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ३० किंवा ४५ शयनयान क्षमतेच्या बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे दिवसा तसेच रात्रीच्या प्रवाशांना त्यांच्या गरजेनुसार प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

मोबाईलवरून तिकीट बुकिंग; खासगी ॲपवरही आरक्षणाची सुविधा

नव्या आराम बससेवेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रवाशांना डिजिटल पद्धतीने सहज आरक्षण करता येणार आहे. एसटीच्या अधिकृत ऑनलाईन आरक्षण व्यवस्थेबरोबरच खासगी डिजिटल ट्रॅव्हल प्लॅटफॉर्मवरूनही या बसेसचे तिकीट आरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा महामंडळाचा मानस आहे. त्यामुळे प्रवाशांना बसस्थानकावर येऊन तिकीट काढण्याची आवश्यकता राहणार नाही. मोबाईलवरून बसची वेळ, मार्ग आणि उपलब्ध आसनांची माहिती घेऊन घरबसल्या आरक्षण करता येणार आहे. डिजिटल तिकीट प्रणालीमुळे एसटीची आराम बससेवा आधुनिक प्रवासी वाहतूक व्यवस्थेशी अधिक प्रभावीपणे जोडली जाणार आहे.

खासगी संस्थेकडून आतिथ्य व्यवस्थापन

प्रवाशांना केवळ आरामदायी बसच नव्हे, तर हाय-एंड प्रवासी सेवांचा अनुभव मिळावा, यासाठी नव्या व्होल्वो बसेसमधील आतिथ्य व्यवस्थापनासाठी खासगी संस्थेची मदत घेण्यात येणार आहे. प्रवाशांचे स्वागत, बसमधील मूलभूत सुविधा, स्वच्छता, प्रवाशांना आवश्यक माहिती आणि सेवा-सुविधांचे व्यवस्थापन यामध्ये प्रशिक्षित मनुष्यबळाचा वापर केला जाणार आहे. यामुळे एसटीच्या पारंपरिक प्रवासी सेवेबरोबरच हॉस्पिटॅलिटी आणि ग्राहकसेवेच्या आधुनिक संकल्पनेचा समावेश होणार असून, प्रवाशांना अधिक सुखकर आणि दर्जेदार प्रवासाचा अनुभव देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

मागणी असलेल्या मार्गांचा सर्वंकष अभ्यास

महाराष्ट्रातील तसेच आंतरराज्य मार्गांवर खासगी आराम बससेवेला मोठी मागणी असलेल्या मार्गांचा सर्वंकष अभ्यास करण्यात येणार आहे. प्रवाशांची संख्या, प्रवासाची मागणी, उपलब्ध सेवा, मार्गाचे अंतर, प्रवासाचा कालावधी आणि आर्थिक व्यवहार्यता यांचा विचार करून स्पर्धात्मक मार्गांचे सर्वेक्षण केले जाईल. त्यानंतर नव्या व्होल्वो आणि शयनयान बसेससाठी मार्ग निश्चित करण्यात येतील.

‘लालपरी’चा आरामदायी प्रवासाचा नवा अध्याय

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे घोषवाक्य अधिक व्यापक आणि आधुनिक स्वरूपात प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने हा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. एसटी महामंडळाची ताकद म्हणजे राज्याच्या कानाकोपऱ्यातील विस्तृत जाळे आणि प्रवाशांचा असलेला विश्वास. या विश्वासाला आधुनिक सुविधा, डिजिटल आरक्षण व्यवस्था आणि दर्जेदार आतिथ्यसेवेची जोड देऊन लांब पल्ल्याच्या प्रवासी सेवेत नवे मानदंड निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, असे मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. नव्या व्होल्वो बसेसमुळे एसटीच्या सेवेला आधुनिकतेची जोड मिळणार असून, आरामदायी, सुरक्षित, विश्वासार्ह आणि डिजिटल सुविधा असलेला प्रवास प्रवाशांसमोर उपलब्ध होणार आहे. आधुनिक तंत्रज्ञान, दर्जेदार सुविधा आणि एसटीवरील विश्वास यांच्या बळावर लांब पल्ल्याच्या प्रवासी सेवेत ‘लालपरी’ आता नव्या दमाने, नव्या रूपात आणि नव्या अनुभवासह सज्ज होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Farmer: शेतकरी दुष्काळाने त्रस्त, कृषिमंत्र्यांसमोर अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त; संतापजनक VIDEO समोर

Maharashtra News Live Update: धुळ्यातील देवपूर प्रभात नगरमध्ये घरफोडी

Skin Care: चेहऱ्यावरचे खडे कमी होऊन स्किन होईल स्मूद आणि ग्लोईंग, घरच्या घरी करा 'हा' सोपा उपाय

Political News: माजी मंत्र्यांची मुलगी निवडणुकीच्या रिंगणात, शिक्षक मंतदार संघ निवडणुकीत मोठी अपडेट

माजी पंतप्रधानांच्या बहिणीला अटक; राजकारणात मोठी खळबळ

SCROLL FOR NEXT