गणेश शिंगाडे, गडचिरोली
गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी येथे महावितरण विभागाच्या कामकाजाबाबत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घरात वीज मीटर बसवलेले नसतानाही संबंधित ग्राहकाला तब्बल २ हजार ३६० रुपयांचे वीज बिल पाठवण्यात आले आहे. या प्रकारामुळे ग्राहकाला मोठा धक्का बसला असून महावितरणच्या कारभारावर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आष्टी येथील एका घरात अद्याप वीज मीटर बसवण्यात आलेले नाही. असे असतानाही या घराच्या नावाने २ हजार ३६० रुपयांचे वीज बिल देण्यात आले. प्रत्यक्षात घरात मीटरच नसताना वीज बिल कशाच्या आधारावर तयार करण्यात आले, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. या बिलामुळे संबंधित ग्राहक चांगलाच अडचणीत आला आहे.
वीज मीटर नसताना बिल पाठवण्याचा हा प्रकार नेमका कशामुळे घडला, याची माहिती ग्राहकाला मिळालेली नाही. महावितरणच्या कार्यालयाकडून याबाबत योग्य स्पष्टीकरण मिळणार का, याची प्रतीक्षा ग्राहक करत आहे. दरम्यान, या घटनेमुळे आष्टी परिसरातील नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. वीज बिलांबाबत यापूर्वीही अनेक ग्राहकांनी तक्रारी केल्याचे बोलले जात आहे. काही ग्राहकांना जास्त रकमेची बिले येत असल्याच्या तक्रारी आहेत. तर आता मीटर नसलेल्या घरालाच बिल आल्याने नागरिकांनी महावितरणच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे.
वीज बिल वेळेवर भरले नाही तर ग्राहकांना वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला जातो. मात्र, चुकीची किंवा अनावश्यक बिले आल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. संबंधित ग्राहकाच्या बिलाची योग्य तपासणी करून ही चूक कशी झाली, याचा शोध घेणे गरजेचे आहे. तसेच चुकीचे बिल रद्द करून ग्राहकाला दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे. आता या प्रकरणाची महावितरण विभागाकडून दखल घेतली जाते का आणि संबंधित ग्राहकाला न्याय मिळतो का, याकडे आष्टीकरांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.