राज ठाकरे उद्धव ठाकरे Saam tv
महाराष्ट्र

Marathi Morcha : राज-उद्धव ठाकरे मराठीसाठी नाही, महापालिका निवडणुकांसाठी एकत्र; शिंदे गटाच्या आमदाराचा खळबळजनक आरोप

Raj Thackeray - Uddhav Thackeray Marathi Morcha : हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात, तसेच मराठीसाठी मराठी माणूस एकवटणार आहे. राज ठाकरे यांची मनसे आणि उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्ष मुंबईत मोर्चा काढणार आहे. यावर प्रतिक्रिया देताना शिंदेंच्या शिवसेना आमदारानं गंभीर आरोप केला आहे.

Nandkumar Joshi

संजय महाजन, जळगाव | साम टीव्ही

महाराष्ट्रातील शाळांमध्ये पहिली ते चौथीपर्यंत हिंदी ही तिसरी भाषा शिकवण्याच्या निर्णयाला सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातून तीव्र विरोध होत आहे. दुसरीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी हिंदी शिकवू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबईत ५ जुलै रोजी राज ठाकरे यांची मनसे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकत्रित मोर्चा काढणार आहेत. या मोर्चात मराठी माणसानं सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलं आहे. तर या मोर्चावरून शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी राज आणि उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. मराठीसाठी नाहीत, तर मुंबई महापालिका निवडणुकांसाठी दोन्ही ठाकरे एकत्र येत आहेत, असा आरोप आमदार पाटील यांनी केला आहे.

राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मराठीसाठी आणि हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात मुंबईत मोर्चा काढणार आहेत. या मोर्चाची रणनीती ठरवण्यात येत आहे. या मोर्चाची तारीख ठरली असली तरी, अद्याप वेळ ठरलेली नाही. दुसरीकडे या मोर्चात सहभागी होण्याबाबत अन्य राजकीय पक्षांच्या भूमिका स्पष्ट नाहीत. तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे पाचोरा येथील आमदार किशोर पाटील यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून अफवा पसरवल्या जात आहेत. मराठीसाठी नाही तर मुंबई महापालिका निवडणुकांसाठी दोन्ही ठाकरे एकत्र येणार आहेत, अशी टीका किशोर पाटील यांनी केली. ठाकरे बंधूंची स्वार्थी भावना आहे. महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून ते दोघे एकत्र येत आहेत, असा आरोपही पाटील यांनी केला.

राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांच्याकडून फक्त मराठीचा आव आणला जात असून मराठीसाठी नव्हे तर मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून स्वार्थी भावनेने ठाकरे बंधू एकत्र येत आहेत.
किशोर पाटील, आमदार, पाचोरा (शिवसेना, शिंदे गट)

राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांच्या मोर्चावर काँग्रेसची भूमिका

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षांकडून काढण्यात येणाऱ्या मोर्चावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. महाराष्ट्रात हिंदीची सक्ती नको, ही भूमिका आम्ही याआधीच मांडली आहे. जर दोन्ही भाऊ एकत्र येऊन या विषयावर मोर्चा काढणार असतील, जर कुठल्याही बॅनरशिवाय मराठीसाठी मोर्चा काढणार असतील आणि दोन्ही भावांचं निमंत्रण आलं तर आम्ही विचार करू आणि त्याबाबत आमची भूमिका सकारात्मक असेल, असे वडेट्टीवार म्हणाले.

कालच मला मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा फोन आला होता आणि त्यांनी मोर्चात सहभागी होण्याची विनंती केली. सोबतच राज ठाकरे यांचाही स्वतंत्र निरोप आहे, हेही त्यांनी सांगितलं. त्यामुळे मी माझ्या पक्षातील सर्व नेत्यांशी चर्चा करतो आणि आम्ही भूमिका घेऊ.
विजय वडेट्टीवार, काँग्रेस

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्रित मोर्चा काढणार आहेत. यावर भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी भूमिका मांडली आहे. मोर्चा काढण्याचा अधिकार सर्वांना आहे. या राज्यात मराठी सक्तीची आहे. भाजप मराठीसाठी कट्टर आहे. मराठीसाठी आग्रही आहे. भाजप आणि केंद्र सरकारमुळेच मराठीला अभिजात दर्जा मिळाला आहे. पर्यायी ऐच्छिक भाषा म्हणून हिंदी आहे. ते लोक किंवा अजून कोणी गैरसमजाचे बळी आहेत. गैरसमज अनावधानाने किंवा प्रयत्नपूर्वक पसरू नयेत, जे सत्य आहे ते लोकांसमोर मांडावे, असे शेलार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar News: अंत्यसंस्कारासाठी जीवघेणा प्रवास, आदिवासींच्या यातना संपेना|VIDEO

Maharashtra Live News Update: पुण्यात शॉक सर्किटमुळे चारचाकी गाडी जळून खाक; कोणतीही जीवितहानी नाही

Mobile Recharge : 400 रुपयांमध्ये 400GB डेटा, धमाकेदार ऑफर

Government Jobs: दहावी उत्तीर्ण असाल तरी नौदलात मिळेल नोकरी; जाणून घ्या पगार अन् अर्ज प्रक्रिया

Akola News : कॉलरामुळे एकाचा मृत्यू, कुटुंबीयांचा ग्रामपंचायत प्रशासनावर गंभीर आरोप; बायको म्हणते मला...

SCROLL FOR NEXT