मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. यासाठी जरांगे यांनी राज्य सरकारला वेळ ठरवून दिली आहे. जरांगे यांना दिलेल्या आश्वासनानंतर राज्य सरकारकडून कुणबी नोंदी शोधण्याचं काम वेगात सुरू आहे. दरम्यान, आतापर्यंत राज्यभरात कुणबींच्या लाखो नोंदी सापडल्या आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मागील १५ दिवसात राज्यात कुणबींच्या (Kunbi Certificate) २९ लाख १ हजार १२१ नोंदी सापडल्या आहेत. यामध्ये सर्वात जास्त नोंदी विदर्भात सापडल्या आहेत. आकडेवारीनुसार, विदर्भामध्ये १३ लाख ३ हजार ८८५ नोंदी सापडल्या आहेत. त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील ४ लाख ४७ हजार ७९२ नोंदींचा समावेश आहे.
दुसरीकडे रत्नागिरी जिल्ह्यात कुणबींच्या केवळ ११८ नोंदी सापडल्या आहेत. यासाठी ५ लाख ६६ हजार ९६४ नोंदी तपासण्यात आल्या होत्या. अचंबित करणारी बाब म्हणजे, ज्या मराठवाड्यापासून कुणबी नोंदी तपासण्यास सुरुवात झाली, तिथे कुणबी जातीच्या फक्त २३ हजार ७२८ सापडल्या आहेत.
कोकणात आतापर्यंत १,२७,१२,७७५ कुणबींच्या नोंदी तपासण्यात आल्या, यामध्ये १,४७,५२९ कुणबी नोंदी सापडल्या आहेत. पुणे विभागात २,१४,४७,५१ नोंदी तपासण्यात आल्या. यामध्ये २,६१,३१५ नोंदी सापडल्या आहेत. नाशिक विभागात १,८८,४१,७५६ पैकी ४,७०,९०० नोंदी सापडल्या.
दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर विभागातील ८ जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत कुणबींच्या १,९१,५१,४०८ नोंदी तपासण्यात आल्या. यामध्ये फक्त २३,७२८ इतक्या नोंदी सापडल्या. अमरावती विभागात १,१२,१२,७०० पैकी १३,०३,८८५ नोंदी सापडल्या. नागपूर विभागात ६५,६७,१२९ पैकी ६,९३,७६४ नोंदी सापडल्या आहेत. या नोंदी आणखी वाढू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.