सचिन बनसोडे, साम टीव्ही
मराठा आरक्षण उपसमितीला ओबीसी आरक्षण उपसमितीच्या धर्तीवर निर्णय घेण्याचे अधिकार द्या, अन्यथा ही समिती बरखास्त करा अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे. निर्णय घेण्याचे अधिकारच नसतील तर राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपसमितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी देखील मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे. यावेळी मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, विविध मराठा संघटनांनी मराठा आरक्षण उपसमिती बरखास्त करण्याची मागणी केली आहे.
शिर्डी येथे मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यातील समन्वयकांची बैठक पार पडली. या बैठकीत मराठा आरक्षण उपसमिती बरखास्त करण्याच्या मागणीसह इतर प्रलंबित मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली. मराठा आरक्षण उप समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांना निर्णय घेण्याचे अधिकार नसून, ते केवळ मुख्यमंत्री आणि मराठा आंदोलन यांच्यातील पोस्टमन म्हणून काम करणार असतील तर त्यांनी तातडीने समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी एकमुखी मागणी या बैठकीत करण्यात आली. ओबीसी आरक्षण समितीच्या धर्तीवर मराठा आरक्षण उपसमितीला निर्णय घेण्याचे अधिकार द्यावेत अन्यथा ही समितीच बरखास्त करावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केली आहे.
मराठा आरक्षणाचे आंदोलन हे सुरुवातीला मराठवाड्याला समोर ठेवून सुरू झाले होते. मात्र मनोज जरांगे यांनी हे आंदोलन राज्यव्यापी केल्याने, मराठवाड्यातील मराठ्यांच्या मागण्या मागे पडल्या. मराठवाड्यासाठी स्वतंत्र बैठक घेण्याचा शब्द देऊ नये राज्य सरकारने अद्याप बैठक घेतली नाही. हिवाळी अधिवेशन सुरू होण्याअगोदर ही बैठक झाली नाही, तर अधिवेशनादरम्यान मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा किशोर चव्हाण यांनी दिला आहे.
ज्या मागण्या मान्य होऊ शकत नाही अशा मागण्या मनोज जरांगे यांनी मांडल्या त्यातून त्यांची अपरिपक्वता दिसून येते. जरांगे समाजातील अभ्यासाकांना विचारात घेत नाही त्यांना एकट्यालाच नेता व्हायचे आहे. समाजाची हानी होत असल्याने मराठा क्रांती मोर्चा पुन्हा मैदानात आल्याची प्रतिक्रिया मराठा समन्वयक संजीव भोर यांनी दिली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात मराठ्यांची दयनीय अवस्था झाली आहे.. मराठा आरक्षणासह समाजाच्या पुढील भवितव्यासाठी अनेक बाबी आवश्यक आहे. गेल्या एक-दीड वर्षांपासून शासन मराठा समाजाच्या विरोधात वातावरण तयार करत असल्याची शंका आहे.. त्यामुळे मराठा समाजाचे भवितव्य सुरक्षित राखण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा पुन्हा सक्रिय झाल्याची प्रतिक्रिया ज्योती मेटे यांनी दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.