मालेगाव : बिबट्या नाव घेतलं तरी अनेकांची पाचावर धारण बसते. मात्र मालेगावच्या एका शेतकरी कुटुंबाने बिबट्याच्या बछड्याचा (Leopard Calf) तब्बल आठवडाभर सांभाळ केला. फक्त सांभाळचं केला नाही तर हे बछडे या कुटुंबातील जणू सदस्यच झालं होतं. त्याचं झालं असं की, मालेगावातील (Malegaon) एका शेतात बिबट्याचे बछडे आढळून आले. बछड्याला घेण्यासाठी आई परत येईल, या हेतूने या बछड्याचा शेतकरी कुटुंबाने आठवडाभर सांभाळ केला. आठवडाभरात या बछड्यालाही कुटुंबाचा लळा लागला. मात्र या बछड्याची आई म्हणजेच मादी बिबट्या परत न आल्याने शेतकरी कुटुंबानं हे बछडे अखेर वनविभागाच्या (Forest Department) स्वाधीन केले. यावेळी शेतकरी कुटूंबालाही गहिवरून आलं होतं.
मालेगावच्या मोरझर शिवारातील रावसाहेब गंगाराम ठाकरे यांच्या शेतातील घराजवळ मांजरीच्या पिल्लासारखं दिसणारं एक पिल्लू घरातील लहान मुलांना दिसलं. मांजरीपेक्षा वेगळा रंग आणि दिसायला गोंडस असल्याने घरातील लहानगेही या पिलासोबत खेळू-बागडू लागले. ते पिल्लूही ठाकरे कुटुंबातील चिमुकल्यांसोबत चांगलंच रमलं. मात्र हे मांजरीचं पिल्लू नसून बिबट्याचे बछडे असल्याचं लक्षात येताच घरातील लोकांना चांगलाच घाम फुटला. काही क्षण घाबरलेल्या ठाकरे कुटुंबानं सावधगिरी बाळगत त्या बछड्याचा सांभाळ केला. त्याला दररोज दीड लिटर दूध पाजलं. इतकंच नाही तर रोज रात्री घराबाहेर ठेवून त्याची आई अर्थात मादी बिबट्या त्यांना घेऊन जाईल अशीही काळजी घेतली. मात्र वाट चुकलेली बिबट्याची मादी आपल्या बछड्याला घ्यायला आली नाही.
या काळात ठाकरे यांच्या कुटुंबातील दीड वर्षांच्या तन्वी या मुलीसोबत बछड्याची भावनिक नाळ जोडली गेली. आठवडाभर बछडा तन्वीसोबत खेळायचा. आठवडा उलटला तरी बछड्याची आई न आल्याने हताश झालेल्या कुटुंबियांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळवलं. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या बछड्याला आपल्या ताब्यात घेतलं आहे. आता त्याची आरोग्य तपासणी करुन त्यांना सुरक्षित ठिकाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.