जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत महायुतीशी संबंधित उमेदवारांनी ६ जागा बिनविरोध
जळगावमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने मिळून ३ जागा बिनविरोध
बार्शी, मोहोळ आणि मंगळवेढा या तालुक्यांमध्ये भाजपचे उमेदवार बिनविरोध
जळगाव आणि सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकांमध्ये महायुतीने जोरदार मुसंडी मारत आपले वर्चस्व सिद्ध केलंय. जळगावमध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजपने मिळून तीन जागा बिनविरोध जिंकल्या आहेत, तर सोलापूर जिल्हा बँकेतही भाजपने बार्शी, मोहोळ आणि मंगळवेढा या तीन तालुक्यांत बिनविरोध विजय मिळवत आपले खाते उघडले.
दुसरीकडे सोलापुरात खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार उत्तम जानकर यांच्यासह शरद पवार गटाच्या नेत्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केल्याने उर्वरित जागांवर मोठी चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. (Mahayuti Wins 6 Unopposed Seats In Jalgaon And Solapur District Bank Elections)
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मोठी राजकीय घडामोड घडलीय. महायुतीने तीन जागा बिनविरोध जिंकल्या. यामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या दोन, तर भाजपच्या एका जागेचा समावेश आहे. पारोळा, एरंडोल आणि भुसावळ विकास सोसायट्यांच्या मतदारसंघातून इतर कोणताही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्यामुळे या तिन्ही जागांवरील उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली.
पारोळा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या निलीनी चिमणराव पाटील (आमदार अमोल पाटील यांच्या मातोश्री) एरंडोल मतदारसंघात मृणाल अमोल पाटील (आमदार अमोल पाटील यांच्या पत्नी). तर भुसावळ मतदारसंघात रजनी संजय सावकारे (मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी). यांची बिनविरोध निवड झालीय. महायुतीमध्ये जागावाटपाचा तिढा अद्याप पूर्णपणे सुटलेला नसतानाच या तीन जागा बिनविरोध झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय.
शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये जागावाटपाबाबत वाटाघाटी सुरू असताना शिंदे गटाचे आमदार अमोल पाटील यांनी भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांच्याशी चर्चा करून आपल्या कुटुंबातील दोन जागा बिनविरोध करून घेतल्याची जोरदार चर्चा सध्या रंगलीय. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारलीय. विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघातील एकूण 11 जागांपैकी बार्शी, मोहोळ आणि मंगळवेढा या तीन महत्त्वाच्या तालुक्यांतील जागा बिनविरोध झाल्या आहेत. या तिन्ही मतदारसंघांमध्ये केवळ एकाच कुटुंबातील सदस्यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. अर्ज मागे घेण्याच्या दिवशी याची केवळ औपचारिक घोषणा होणे बाकी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.