सचिन जाधव| पुणे प्रतिनिधी | साम टीव्ही मराठी
Maharashtra weather forecast today October 2026 : देशभरातून नैऋत्य मोसमी पाऊस पूर्णपणे माघारी परतला असला, तरी महाराष्ट्रातील काही भागांत पावसाचे सावट अद्याप कायम आहे. आजपासून येत्या सोमवारीपर्यंत कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) वर्तवली आहे. राज्यात पुढील काही दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे, सोलापूरसह १० जिल्ह्यात आज विजांसह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, ईशान्य उत्तर प्रदेशापासून पूर्व-मध्य अरबी समुद्रापर्यंत (पूर्व मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रावरून) एक द्रोणीय रेषा जात आहे. या वातावरण बदलामुळे राज्यात पुन्हा एकदा ढगाळ हवामान निर्माण झाले असून, काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळू शकतात.
गेल्या २४ तासांत कोकण, गोवा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ नोंदवली गेली आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमान सरासरीच्या आसपास राहिले आहे. कोकणातील ठाणे, मुंबई, रायगड जिल्ह्यांत उन्हाचा चटका वाढून दमट हवामानाची शक्यता असल्याने, तसेच सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. तर रत्नागिरी, पुणे, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
पुण्यात कसे राहील हवामान?
पुणे आणि आसपासच्या परिसराबद्दल बोलायचे झाल्यास, आज आणि उद्या (शनिवारी) आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे. मात्र, रविवारपासून ते बुधवारी दरम्यान सकाळच्या वेळी निरभ्र आकाश आणि दुपारी किंवा संध्याकाळच्या सुमारास अंशतः ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
विजांसह वादळी पावसाची शक्यता (येलो अलर्ट) -
सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, रत्नागिरी, पुणे, लातूर, नांदेड.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.