नागपूर विद्यापीठाच्या निकालात विद्यार्थ्याला पूर्ण गुण असूनही नापास दाखवले.
विद्यार्थ्याने विद्यापीठ व महाविद्यालयात तक्रार केली पण दखल घेतली नाही.
अखेर न्यायालयात याचिका दाखल; खंडपीठाने विद्यापीठाला नोटीस बजावली.
शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येत असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले.
शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या करिअरशी संबंधित गंभीर निष्काळजीपणाचा प्रकार समोर आला आहे. वसंतराव नाईक शासकीय कला आणि विज्ञान महाविद्यालयातील सर्वेश उमेश घाटोळे या बी.ए.च्या विद्यार्थ्याला दोन विषयांत पूर्ण गुण मिळूनही निकालपत्रकात ‘नापास’ दाखवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. यामुळे संबंधित विद्यार्थ्याला मानसिक त्रास सहन करावा लागला असून अखेर न्यायालयाचे दार ठोठवावे लागले आहे.
सर्वेश घाटोळे हा वसंतराव नाईक शासकीय कला व विज्ञान महाविद्यालयात बी.ए.चे शिक्षण घेत आहे. हे महाविद्यालय नागपूर विद्यापीठाशी संलग्न आहे. जानेवारी २०२५ मध्ये घेतलेल्या पहिल्या सत्राच्या परीक्षेत त्याने "व्होकेशनल स्किल कोर्स – ऑर्गनायझिंग सोशल सर्व्हे" आणि "स्किल एन्हान्समेंट कोर्स – वर्किंग विथ कल्चर" या दोन्ही विषयांत पूर्ण गुण मिळवले. परंतु निकालपत्रकात या दोन्ही विषयांपुढे ‘#’ हे चिन्ह लावण्यात आले. हे चिन्ह म्हणजे विद्यार्थी त्या विषयात नापास झाल्याचे दर्शवते. त्यामुळे निकालपत्रकानुसार सर्वेश घाटोळे नापास ठरला.
या त्रुटीबाबत विद्यार्थ्याने सुरुवातीला आपल्या महाविद्यालय प्रशासनाशी संपर्क साधला. त्याने निकाल दुरुस्त करून द्यावा, अशी मागणी केली. त्यानंतर त्याने नागपूर विद्यापीठाकडेही दाद मागितली. मात्र, विद्यापीठाने त्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप सर्वेश घाटोळेने केला आहे. त्यामुळे शेवटी विद्यार्थ्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली.
या याचिकेवर सुनावणी घेत नागपूर खंडपीठाने विद्यापीठ प्रशासन तसेच वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालयाच्या प्राचार्यांना नोटीस बजावली आहे. अशा प्रकारच्या त्रुटीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आयुष्य धोक्यात येऊ शकते, त्यांची प्रगती रोखली जाऊ शकते, याकडे न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. पुढील सुनावणीदरम्यान विद्यापीठाने आपले स्पष्टीकरण मांडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून निकाल जाहीर केले जात असताना अशा मूलभूत चुका घडतात कशा, हा प्रश्न विद्यार्थी आणि पालक वर्गातून उपस्थित करण्यात येत आहे. सर्वेश घाटोळेच्या प्रकरणाने अशा अनेक विद्यार्थ्यांच्या समस्या अधोरेखित केल्या आहेत. विद्यापीठ प्रशासनाने यापुढे अशा त्रुटी टाळण्यासाठी अधिक पारदर्शक आणि जबाबदार प्रणाली विकसित करण्याची गरज आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.