राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपने मास्टरप्लान तयार केला आहे.
प्रत्येक जिल्ह्यासाठी निवडणूक प्रमुख आणि प्रभारींची नियुक्ती करण्यात आली आहे.
कोकणात नितेश राणे, पुण्यात मुरलीधर मोहोळ आणि बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
जिल्हा परिषद, महापालिका आणि नगरपरिषद निवडणुकांसाठी भाजप संघटन सज्ज झाली आहे.
BJP announces district election heads across Maharashtra : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून मास्टरप्लान तयार करण्यात आलाय. भाजपकडून विधानसभेप्रमाणेच सर्व जिल्ह्यात निवडणूक प्रमुख निवडले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जिल्हा निवडणुक प्रमुख व जिल्हा निवडणूक प्रभारी यांच्या नियुक्तीची घोषणा केली. नितेश राणे यांच्याकडे कोकणात मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. तर पुण्यात मोहोळ आणि बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
राज्यात सध्या आचारसंहिता लागू झालेली आहे. नगरपरिषदेच्या निवडणुकीनंतर जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या निवडणुका होणार आहे. नगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकींची व्यूहरचना करणे, उमेदवारांची चाचपणी करून त्यांची यादी अंतिम करणे, त्याचा प्रस्ताव प्रदेशाकडे पाठवणे, आवश्यक तेथे बाहेरील उमेदवारांचा पक्ष प्रवेश करून घेणे, मतदान केंद्राची रचना लावून घेणे अशी कामे संघटनेकडून केली जातात, यामध्ये निवडणूक प्रभारी आणि निवडणूक प्रमुख यांची भूमिका महत्त्वाची असते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय भाजपकडून घेण्यात आला आहे. निवडणूक प्रमुख म्हणून माजी आमदार प्रमोद जठार यांची निवड प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केली आहे. तर नितेश राणे यांच्याकडे निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. कोकणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यश मिळवण्याची जबाबदारी राणेंच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.
भाजपची नाशिक महापालिका निवडणुकीची जबाबदारी आमदार राहुल ढिकलेंवर सोपवण्यात आली आहे. नाशिक शहर निवडणूक प्रमुख म्हणून ढिकले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. देवयानी फरांदे आणि सीमा हिरे या दोन सिनिअर आमदारांना डावलून ढिकलेंवर जबाबदारी देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. राहुल ढिकले हे नाशिक पूर्व मतदारसंघाचे आमदार आहेत.
भाजपकडून निवडणुकीच्या तयारीला सुरुवात करण्यात आली. पुण्यासह राज्यभरात निवडणूक प्रभारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका आणि पुणे ग्रामीण दक्षिण (बारामती), पुणे ग्रामीण उत्तर (मावळ) या भागांसाठी निवडणूक प्रभारी म्हणून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. निवडणूक प्रमुख म्हणून माजी सभागृह नेते गणेश बिडकर, आमदार महेश लांडगे, राहुल कुल आणि शंकर जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.