Maharashtra News Live Update Saam Tv News
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update: सुनेत्राताई पवारांच्या हस्ते 'आठवणीतले दादा' स्मरणपुस्तिकेचे प्रकाशन

Marathi Breaking Live Headlines Updates : दिल्लीत सीजीपीचे आज तिरंगा मोर्चा, महाराष्ट्रात राजू शेट्टींचे आंदोलन, नवरात्रौउत्सव, १० जिल्ह्यात पावसाचा इशारा, देशातील राजकीय घडामोडी, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

सुनेत्राताई पवारांच्या हस्ते 'आठवणीतले दादा' स्मरणपुस्तिकेचे प्रकाशन

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जीवनप्रवासाला उजाळा देणाऱ्या ‘आठवणीतले दादा’ या स्मरणपुस्तिकेचे प्रकाशन मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते करण्यात आले. कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांच्या संकल्पनेतून ही पुस्तिका साकारण्यात आली आहे. यामध्ये अजितदादांचे नेतृत्व, संघर्षमय जीवनप्रवास, विकासाभिमुख विचार, धडाडीचे कार्य आणि कार्यकर्त्यांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते यांचा भावपूर्ण शब्दांत आढावा घेण्यात आला आहे.

अमरावती विद्यापीठात बॅटरीच्या स्फोटाने आग; तीन दुचाकी जळून खाक

अमरावतीच्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. विद्यापीठाच्या अतिसंवेदनशील गोपनीय विभागाच्या बेसमेंटमध्ये ही आग लागली. प्राथमिक माहितीनुसार, एका दुचाकीच्या बॅटरीचा स्फोट झाल्याने आग लागली. या आगीत तीन दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्या, तर एका दुचाकीचे अंशतः नुकसान झाले. परिसरात धुराचे लोट पसरले होते. अग्निशमन दलाने आग नियंत्रणात आणली. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

नांदेडमध्ये कार पुलावरून मन्याड नदीत कोसळली; पत्नीचा मृत्यू, पती बचावला

नांदेडच्या कंधार तालुक्यातील बहादरपूर पुलावर मध्यरात्री दोनच्या सुमारास भीषण अपघात घडला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट पुलावरून मन्याड नदीत कोसळली. या दुर्घटनेत पार्वतीबाई गुट्टे यांचा बुडून मृत्यू झाला, तर पती लक्ष्मण गुट्टे यांना पोहता येत असल्याने त्यांनी नदीबाहेर येत स्वतःचा जीव वाचवला. हे दाम्पत्य नांदेडहून मुखेड तालुक्यातील सावरगाव वाडीकडे जात होते. क्रेनच्या साहाय्याने कार आणि पार्वतीबाई यांचा मृतदेह नदीबाहेर काढण्यात आला.

नाशिकमध्ये मोठा वाद! त्र्यंबकेश्वरच्या धर्मध्वजावर खासगी संघटनेचा लोगो लावल्याप्रकरणी आक्षेप; प्रशासनाची उडाली दाणादाण

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत ३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या प्रस्तावित ध्वजारोहण सोहळ्यापूर्वीच त्र्यंबकेश्वरमधील कुशावर्त तीर्थावर उभारलेल्या ३१ फुटी धर्मध्वजस्तंभावरील बोधचिन्हावरून नवा वाद निर्माण झाला आहे. कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते या ध्वजस्तंभाचे पूजन झाल्यानंतर, यावर त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाचे स्वतंत्र बोधचिन्ह वापरण्यात आल्याचा आक्षेप देवस्थानच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी घेतला आहे. कुंभमेळ्याचा धर्मध्वज हा सर्व धार्मिक परंपरांचे प्रतिनिधित्व करणारा असावा आणि त्यावर समुद्रमंथन व चौदा रत्नांचे चित्रण असावे, अशी मागणी होत असल्याने आता ऐन सोहळ्याच्या तोंडावर प्रशासन काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मराठवाडा पदवीधर मतदार संघाची निवडणूक,महायुती मधील वाद चव्हाट्यावर

धाराशिव - मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत सत्तेत असणाऱ्या महायुती मधील वाद चव्हाट्यावर आला आहे.राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थित ठेवलेल्या पदवीधरांच्या मेळाव्याला शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर व शिवसेना नेते गैरहजर राहिले आहेत कार्यक्रमाच्या ठिकाणी शिवसेना पक्षाचे झेंडे,बॅनरवर नेत्यांचे फोटो झळकले मात्र कार्यक्रमाच्या ठिकाणी शिवसेनेचा एकही छोटा मोठा पुढारी फिरकलाच नाही.

निळवंडे धरणातून पाणी सोडल्याने उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला काहिसा दिलासा

अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा आणि निळवंडे धरण समुहातून पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडल्याने उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांना काहिसा दिलासा मिळाला आहे.. प्रवरा नदिवरील अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजनांसाठी नदिवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरण्यासाठी हे पाणी नदीपात्रात झेपावत आहे.. दुष्काळामुळे खरीप पिक तर हातचे गेले आहे, मात्र आता जनावरांचा चारापाणी आणि गावागावातील पाणीपुरवठा योजनांसाठी हे पाणी सोडल्याने नागरीकांना काहिसा दिलासा मिळाला आहे.

शिरूरच्या आनंद सोसायटीत गोळीबाराचा थरार; रहिवाशाच्या पायाला गोळी, प्रकृती चिंताजनक

शिरुर शहर पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेने हादरलय शिरूर शहरातील रामलिंग रोडवरील आनंद सोसायटीत चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरट्याने गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. चोरट्याला पकडण्याच्या प्रयत्नात एका रहिवाशाच्या पायाला गोळी लागली असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पात केवळ 39.85 टक्के जलसाठा शिल्लक

यंदा पावसाने पाठ फिरवल्याने वाशिम शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी मध्यम प्प्रकल्पाची संकल्पित क्षमता 11.97 दशलक्ष घनमीटर असताना सध्या 4.77 दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध आहे.म्हणजेच 39.85 टक्के जलसाठा शिल्लक आहे..

त्यातील मृत जलसाठा वगळता प्रत्यक्ष वापरासाठी अवघे २९ टक्के पाणी शिल्लक राहते. या मर्यादित साठ्यातून पुढील जवळपास आठ महिने शहराचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याचे मोठे आव्हान नगरपालिका प्रशासनासमोर आहे.

कोल्हापूरकरांवर पाणी कपातीचे संकट

पाणी वाचवण्यासाठी कोल्हापूर महापालिका प्रशासनाकडून आजपासून शहरात दहा टक्के पाणी कपात लागू करण्यात येणार आहे. शासनाच्या आदेशानुसार ही कपात केली जाणार असून, त्यामुळे शहरवासीयांना दररोजच्या तुलनेत कमी पाणी मिळणार आहे. पाणी बचतीसाठी महापालिकेने उपसा आणि पाणी वितरणाच्या वेळेत कपात करण्याचे नियोजन केले आहे. दरम्यान, शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्याबाबतचा निर्णय दिवाळीपूर्वी होणार की दिवाळीनंतर, याकडे आता कोल्हापूरकरांचे लक्ष लागले आहे.

अल्पसंख्यांक संस्थांना पवित्र पोर्टल द्वारे नियुक्त करणे बंधनकारक नाही, हायकोर्टाचा निर्णय

अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे नियुक्ती पवित्र पोर्टल मार्फत करणे आणि या नियुक्त्यांसाठी पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हा निर्णय दिला आहे, त्यामुळे अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. आमदार धर्मरावबाबा आत्राम सचिव असलेल्या भगवंतराव स्मृती शिक्षण संस्थेला अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थेचा दर्जा मिळाला आहे.

मटका किंग व्हीआयपी दर्शन प्रकरणी दोन दिवस उलटूनही कारवाई नाही

तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यात गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्या व्यक्तीला व्हीआयपी दर्शन दिल्याच्या प्रकरणावरून आता भोपे पुजारी मंडळ आक्रमक झालंय. प्रकरण समोर येऊन दोन दिवस उलटले, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे तक्रारही दाखल झाली; मात्र अद्याप कारवाई झाली नसल्याचा दावा करत पुजारी मंडळाने मंदिर प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय सामान्य भाविकांना दर्शनासाठी तासनतास रांगेत उभं राहावं लागत असताना, मटका किंगला थेट गाभाऱ्यात प्रवेश कसा मिळाला, याची सखोल चौकशी करण्याची मागणी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम यांनी केलीय. एवढंच नाही, तर एका व्यक्तीला गाभाऱ्यात प्रवेश मिळत असेल, तर वशिल्याने अशाच प्रकारे शेकडो जणांना व्हीआयपी दर्शन दिलं जातं का, हेही तपासण्याची मागणी त्यांनी केलीय. संबंधितांवर कारवाई करावी,अन्यथा मंदिर कार्यालयात आंदोलन करू आणि वेळप्रसंगी न्यायालयातही जाऊ,असा इशारा अमरराजे कदम यांनी दिलाय.

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात महावितरणच्या डीपी चोरी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये महावितरणच्या डीपी चोरी करण्याच्या घटना वारंवार घडत होत्या. महावितरणच्या डीपी मधील महागडी तांब्याची तार चोरी करून विकण्यासाठी चोरटे महावितरण ची डीपी चोरत होते.

या गुंन्ह्याच गांभीर्य लक्षात घेऊन पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या पुणे शाखा क्रमांक तीन पथकाने डीपी चोरी करणाऱ्या टोळी तील तीन चोरट्यांना मरकळ भागातून बेड्या ठोकल्या आहेत. तसेच त्यांच्या ताब्यातून जवळपास पाच लाख 91 हजार रुपये किमतीचे तांब्याचे तार, चोरी करण्यासाठी वापरले जाणारे हत्यार आणि दुचाकी वाहन पोलिसांनी जप्त केले असून महावितरणचे डीपी चोरीचे सहा गुन्ह उघडकीस आणले आहेत. संभाजी जैसवार, विनोद जैसवार आणि मनीष प्रसाद या तीन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून जुल्फकार खान हा आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

24 तास उलटूनही दुसऱ्या दिवशी चामोर्शी जामच - भेंडाळा परिसरातील 14 गावांचे चक्काजाम आंदोलन सुरूच

गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथे भेंडाळा परिसरातील 14 गावांच्या नागरिकांनी पुकारलेले चक्काजाम आंदोलन 24 तास उलटूनही सुरूच आहे. MIDC साठी शेती न देण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. 24 तासांपासून रस्ता रोकोमुळे संपूर्ण चामोर्शी जाम झाले असून याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गणेश शिंगाडे यांनी.

मी सध्या उभा आहे गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथे. माझ्या मागे आपण बघू शकता, भेंडाळा परिसरातील 14 गावांतील नागरिकांचा हा चक्काजाम आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. 24 तास उलटून गेले, तरीही एकही नागरिक या रस्त्यावरून हटलेला नाही.

पुणे जिल्ह्यात पीक नुकसानीचे ८० टक्के पंचनामे पूर्ण,जिल्हाधिकारी डुडी यांची माहिती

परिस्थितीच्या 'दुष्काळी पार्श्वभूमीवर, पीक नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू असून, आतापर्यंत जिल्ह्यातील सुमारे ८० टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत.

येत्या रविवारपर्यंत पंचनाम्यांचे काम पूर्ण करण्याचे प्रशासनाचे उद्दिष्ट आहे.त्यानंतर राज्य सरकारकडे निधीची मागणी करण्यात येणार असून, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत,'

३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पावसाची कमतरता राहिली, तरी नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा करता यावा या दृष्टीने पाण्याचे नियोजन करण्यावर भर देण्यात येणार आहे,' अशी माहिती डुडी यांनी दिली.

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम

राज्यातील एकाही पात्र मतदाराचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या उद्देशाने मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र आणि भारत निवडणूक आयोगाच्या वतीने राज्यभर विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत १७, १८ तसेच २४ आणि २५ ऑक्टोबर २०२६ रोजी राज्यातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घेऊन प्रारूप मतदार यादीतील आपले नाव तपासावे आणि आवश्यकतेनुसार दावे व हरकती २६ ऑक्टोबरपर्यंत सादर कराव्यात, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

छत्रपती संभाजीनगर : मंत्र्यांचा 'डीपफेक व्हिडिओ' पाहून अधिकारी सायबर जाळ्यात; १७ लाख गमावले

सायबर गुन्हेगारांनी आता एआयच्या माध्यमातून एडिट केलेल्या देशाच्या उच्चपदस्थ नेत्यांच्या आणि व्हिडिओंचा घातक ट्रेंड सुरू केला आहे. फेसबुकवर मंत्र्यांची शेअर मार्केटमधील गुंतवणुकीबाबत खोटी क्लिप पाहणाऱ्या एका कंपनीतील प्रोडक्शन ऑफिसरला सायबर गुन्हेगारांनी फॉरेक्स ट्रेडिंगच्या बोगस जाळ्यात ओढले. ६१ दिवस त्यांना आभासी पोर्टफोलिओमध्ये अडकवून ठेवत तब्बल १७ लाख ३४ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली. याप्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जटवाडा परिसरात राहणारे ४० वर्षीय तक्रारदार शेंद्रा येथील एका नामांकित कंपनीत प्रोडक्शन ऑफिसर आहेत.

मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवींमध्ये १३,७८५ कोटी रुपयांची घट

मुंबई महापालिकेच्या आर्थिक स्थितीवर काँग्रेसचा सवाल

मुंबई महापालिकेच्या घटत्या ठेवी आणि वाढत्या आर्थिक दायित्वांवर काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमी यांचे आयुक्तांना पत्र

२०२१ मध्ये ९१,६९० कोटींच्या ठेवी; फेब्रुवारी २०२६ पर्यंत ७७,९०५ कोटींवर आल्याचा पत्रात दावा

अलीकडील आठ महिन्यांत ठेवींमध्ये ३,५४४ कोटी रुपयांची घट झाल्याचे पत्रात नमूद

महापालिकेच्या विविध प्रकल्पांची एकूण आर्थिक बांधिलकी सुमारे २.४४ लाख कोटी रुपये असल्याचा दावा

कोस्टल रोड, गोरेगाव-मुलुंड लिंक रोड, सिमेंट काँक्रीट रस्ते, सांडपाणी प्रक्रिया केंद्र आणि पाणीपुरवठा प्रकल्पांचा समावेश

चालू आर्थिक वर्षात सुमारे ८ हजार कोटी रुपये कंत्राटदारांना देय असल्याचा उल्लेख

Maharashtra News Live Update: पुणे शिक्षक मतदारसंघात महायुतीमध्येच संघर्ष

मुख्यमंत्री फडणवीसांचा पाचही जागा महायुती लढवणार असल्याचा दावा

महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याचे एकनाथ शिंदेंकडून स्पष्ट

अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना शिवसेना शिंदे गटाचा पाठिंबा

पुणे शिक्षक मतदारसंघात सानप यांच्या पाठीशी शिवसेनेची ताकद

काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते, शिंदेंचे स्पष्टीकरण

भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्यासमोर सचिन सानप यांचे आव्हान

सानप विरुद्ध गावडे लढतीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: शिवसेनेत खलबतं! एकनाथ शिंदे मंत्र्यांवर नाराज, तातडीची बैठक बोलावत दिली तंबी

Gold Rate Today : दसऱ्याआधी सोनं स्वस्त झालं की महागले? २४, २२, १८ कॅरेटचे ताजे दर आले समोर

Surya Namaskar: १०,००० पावले, सायकलिंग किंवा जिम विसरा; 'हा' व्यायाम आहे लय भारी

Fenugreek Seeds: वजन ते शुगर कंट्रोल...; मेथीच्या दाण्यांचे हे ९ अद्भूत फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

Long Hair Care Tips For Women: केसांच्या वाढीसाठी घरगुती उपाय, मेथी आणि तांदळाचा हेअर सीरम लावा

SCROLL FOR NEXT