हिंगोली जिल्ह्यात सकाळी 9.43 वाजता भूकंपाचा धक्का
नांदेड शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांत भूकंपाचे हादरे
यवतमाळच्या उमरखेड परिसरात 3.3 रिश्टर स्केलचा धक्का
कोणतीही जीवित हानी नसल्याची प्रशासनाची माहिती
महाराष्ट्रातून मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात आज सकाळच्या सुमारास भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान या भूकंपात कोणतीही जीवित हानी झालेली नसल्याचं प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
आज सकाळी ९ वाजून ४३ मिनिटांच्या सुमारास हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागात भूकंपाचा हादरा जाणवला. अचानक जमीन हादरल्याने अनेक नागरिक घाबरून घराबाहेर पडले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील पांगरा शिंदे गावाजवळ असल्याचे सांगण्यात आले आहे. या भूकंपाची तीव्रता 4.5 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यातील बहुतांश भागात या भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपानंतर शाळेतील मुलांना देखील घरी सोडण्यात आले.
या भूकंपाचा परिणाम लगतच्या नांदेड जिल्ह्यातही जाणवला. नांदेड शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी सकाळी 9.43 वाजता भूकंपाचा जोरदार धक्का जाणवला. धक्का जाणवताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि काही ठिकाणी नागरिक सुरक्षिततेसाठी घराबाहेर पडल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड परिसरालाही भूकंपाचा धक्का जाणवला. सकाळी 9 वाजून 44 मिनिटांच्या सुमारास उमरखेड शहर आणि परिसरात हादरे जाणवले. उमरखेड परिसरात भूकंपाची तीव्रता 3.3 रिश्टर स्केल असल्याची माहिती समोर आली आहे. उमरखेड परिसरातील या भूकंपाचा संबंध हिंगोली जिल्ह्यातील भूकंपकेंद्राशी असल्याचे सांगण्यात येत आहे. भूकंपाच्या धक्क्यांनंतर प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. प्राथमिक माहितीनुसार, या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा मोठ्या नुकसानीची नोंद झालेली नाही. मात्र, अचानक जाणवलेल्या जोरदार हादऱ्यामुळे नागरिकांमध्ये काही काळ घबराट पसरली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.