भरत नागणे
यंदा राज्यावर दुष्काळाचे सावट, शेतीचे नुकसान आणि आर्थिक अडचणींचे संकट असतानाही विठ्ठल भक्तांची पांडुरंगावरील श्रद्धा मात्र तसूभरही कमी झालेली नाही. कार्तिकी यात्रेत भाविकांची संख्या तुलनेने कमी राहिली असली, तरी श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी अर्पण होणाऱ्या दानात मोठी वाढ झाली आहे. यंदाच्या कार्तिकी यात्रेत मंदिर समितीला तब्बल ६ कोटी ३९ लाख ३५ हजार २२ रुपयांचे उत्पन्न मिळाले असून, मागील वर्षाच्या तुलनेत १ कोटी २० लाख ५७ हजार रुपयांची वाढ झाली आहे.
कार्तिकी शुद्ध प्रतिपदा ते पौर्णिमा, म्हणजेच १० ते २४ नोव्हेंबर या १५ दिवसांच्या कालावधीत मंदिर समितीला हे उत्पन्न प्राप्त झाले. मागील वर्षी याच कालावधीत ५ कोटी १८ लाख ७७ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. यंदा दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या ७ लाख ३१ हजार इतकी राहिली. गर्दी तुलनेने कमी असतानाही दानात झालेली वाढ हे यंदाच्या यात्रेचे विशेष वैशिष्ट्य ठरले आहे.
यंदा भाविकांनी सर्वाधिक दान सोने-चांदीच्या स्वरूपात अर्पण केले. त्यातून १ कोटी ८४ लाख २२ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. देणगीतून १ कोटी ४३ लाख ६१ हजार, हुंडीपेटीतून १ कोटी ४१ लाख ४० हजार, भक्तनिवासातून ५९ लाख ८५ हजार, तर श्रींच्या चरणाजवळ अर्पण केलेल्या रकमेतून ५१ लाख ५५ हजार रुपये जमा झाले.
याशिवाय लाडू प्रसाद विक्रीतून ४८ लाख ५८ हजार, पूजेतून ३ लाख ३० हजार, तर अगरबत्ती, चंदन, महावस्त्रे, फोटो आणि लॉकरच्या माध्यमातून ६ लाख ८० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले.
दुष्काळामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य भाविक आर्थिक अडचणीत असतानाही त्यांनी आपल्या परीने विठ्ठलाच्या चरणी दान अर्पण केले. रोख रक्कम, सोने-चांदी आणि विविध माध्यमांतून भाविकांनी आपली भक्ती व्यक्त केली.
मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांनी उत्पन्नाची माहिती दिली. तर व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांनी भाविकांकडून मिळणाऱ्या देणगीचा उपयोग वारकरी आणि भाविकांना अधिक चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केला जाणार असल्याचे सांगितले.
एकीकडे दुष्काळाचे संकट आणि दुसरीकडे आर्थिक अडचणी असतानाही विठुरायावरील श्रद्धा कायम असल्याचे यंदाच्या कार्तिकी यात्रेतील दानातून स्पष्ट झाले आहे. भाविकांची गर्दी कमी झाली, पण पांडुरंगाच्या चरणी अर्पण होणाऱ्या भक्तीचा आणि दानाचा ओघ मात्र वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.