Maharashtra Assembly Winter Session : महाराष्ट्र राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात जोरदार खडाजंगी बघायला मिळाली. विकासकामांना स्थगिती देण्याच्या मुद्द्यावरून अजित पवार यांनी प्रश्न उपस्थित केले. त्याला देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं. काही गोष्टी आम्ही तुमच्याकडूनच शिकलो आहोत, असा टोला फडणवीसांनी यावेळी लगावला. (Maharashtra Political News)
राज्य विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष आक्रमक झाला होता. तर आज मंगळवारी विकासकामांच्या स्थगितीचा मुद्दा विधानसभेत चांगलाच गाजला. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या विकासकामांच्या स्थगितीचा मुद्दा उपस्थित करत सरकारला धारेवर धरले. राज्यात शिंदे-फडणवीस यांचं सरकार आल्यानंतर तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या विकासकामांना स्थगिती दिल्याचा आरोप अजित पवार यांनी केला.
राज्यात शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) यांचं सरकार सत्तेत आलं. व्हाइट बुकमध्ये जी विकासकामं आली होती, त्या सर्व कामांना स्थगिती देण्याचं काम या सरकारनं केलं, असं अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले. आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाही भेटलो. इतर नेतेही भेटले होते. आतापर्यंत व्हाइट बुकमधील कामांना कधीही स्थगिती दिली नव्हती. ही कामं राज्यातीलच आहेत, ती गुजरात किंवा तेलंगणामधील नव्हती. ती काम थांबवण्यात आली, असा सवालही अजित पवार यांनी उपस्थित केला.
फडणवीस यांनी दिलं उत्तर
अजित पवार यांनी विकासकामांच्या स्थगितीच्या मुद्द्यावरून सरकारला सवाल केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. तुम्ही जास्त वेळा निवडून आलात. आम्ही कमी वेळा निवडून आलोय. पण अजितदादा, काही गोष्टी आम्ही तुमच्याकडूनच शिकलो आहोत, असा टोला त्यांनी लगावला.
महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले. आमची सर्व विकासकामे तुम्ही थांबवली होती, माझ्या मतदारसंघातील कामेही तुम्ही थांबवली होती, असेही ते म्हणाले. स्थगितीच्या मुद्द्याला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, ज्या विकासकामांना स्थगिती दिल्या होती, त्यापैकी ७० टक्के विकासकामांवरील स्थगिती उठवण्यात आली आहे. पण उर्वरित स्थगिती ही निधी वाटपात नियम न पाळल्याने कायम ठेवली आहे.
Edited By - Nandkumar Joshi
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.