संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही
पक्ष फोडाफोडीवरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली. या कारणामुळे राजकीय वातावरण तापले होते. मात्र, वरिष्ठ पातळीवर झालेल्या समझोत्यावरून हे प्रकरण शांत झाले. दरम्यान, या मुद्द्यावर पुन्हा एकदा कल्याणमध्ये दोन्ही पक्ष समोरासमोर आले आहेत. यावेळी त्यांच्यातील नाराजीला निमित्त ठरले आहे ते अरुण गीध.
अरुण आणि त्यांच्या भगिनी वंदना गीध यांनी काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना प्रवेश न देण्याचा अलिखित करार झालेला असतानाही गीध यांचा प्रवेश कसा काय करून घेतला? असा सवाल कल्याण पश्चिमेतील माजी आमदार नरेंद्र पवार यांनी उपस्थित केला आहे.
काही आठवड्यांपूर्वी एकमेकांचे पक्ष फोडण्याच्या मुद्द्यावरून संपूर्ण राज्यभरामध्ये शिवसेना आणि भाजपमधील वातावरण चांगलेच तापले होते. ज्याचे पडसाद थेट दिल्लीमध्येही उमटलेले दिसून आले. त्यानंतर मग दोन्ही पक्षांनी एकमेकांचे पदाधिकारी आणि नगरसेवक कार्यकर्त्यांना प्रवेश न देण्याचा निर्णय राज्य पातळीवर घेण्यात आल्यानंतर हे ताणले गेलेले संबंध निवळले होते. मात्र हा शमलेला वाद आता पुन्हा सुरू होण्याची चिन्हे दिसून येत आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कल्याण पश्चिमेतील वरिष्ठ नगरसेवक अरुण गीध आणि त्यांच्या भगिनी वंदना गीध शिवसेनेत प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत माहितीही दिली आहे.
मात्र गीध बंधू - भगिनींच्या या शिवसेना पक्षप्रवेशानंतर भाजपाकडून तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. कल्याण पश्चिमेतील भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी याबाबत माध्यमांशी संवाद साधत शिवसेनेच्या या दुहेरी भूमिकेबाबत विरोध व्यक्त केला आहे. एकेमकांचे पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते न घेण्याचा अलिखित करार दोन्ही पक्षांमध्ये झाल्याची आठवणही पवार यांनी यावेळी करून दिली आहे.
तसेच आमच्याकडेही शिवसेनेचे कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूरचे अनेक नगरसेवक प्रवेश घेण्यासाठी रांगेत उभे आहेत. शिवसेनेकडून अशाप्रकारे पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले जाणार असेल तर आम्हालाही मग आमची भूमिका बदलावी लागेल, अशा तीव्र शब्दांत माजी आमदार नरेंद्र पवार यांनी शिवसेनेला इशारा दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.