अभिजित देशमुख
कल्याण : कल्याणमध्ये फसवणुकीची आणखी एक घटना समोर आली आहे. या घटनेत एका नामांकित कंपनीकडून कर्ज देण्याचे आमिष दाखवून ऑनलाईन पद्धतीने लाखो रुपये उकळणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. यात मानपाडा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तर एक जण फरार झाला आहे. दरम्यान या टोळीने किती जणांची फसवणूक केली याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.
कर्जाचे आमिष दाखवून ऑनलाईन लाख रुपये उकळण्याची तक्रार मानपाडा पोलीस ठाण्यात डोंबिवली पूर्वेकडील आजदे गावात राहणाऱ्या किरण कोळी यांनी केली होती. किरण यांना पैशांची गरज होती. याच दरम्यान त्यांना एका दिवशी मोबाईलवर फोन आला. फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने फायनान्स कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. कर्ज देणार असल्याचे सांगत लोनसाठी लागणारे विविध प्रकारचे चार्जेस असल्याचे सांगून त्यांच्याकडून त्यांनी एक लाख रुपये घेतले.
मानपाडा पोलिसात तक्रार
दरम्यान कर्ज मंजुरीसाठी पैसे देऊन बराच कालावधी उलटला. मात्र लोन न मिळाल्याने किरण यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार याबाबत तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलिस निरिक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक राम चोपडे यांनी प्रकरणाचा तपास सुरु केला. तपासादरम्यान जो मोबाईल नंबर आणि बँक आकाऊंटनंबर हा बंगालचा असल्याचे लक्षात आले.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध
तर सदरच्या अकाउंटमधून पैसे हे अंबरनाथ आणि मलंग रोडवरील एटीएममधून काढल्याचे लक्षात आले. पोलिसांनी एटीएममधील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या दोन व्यक्तीचा शोध सुरू केला. त्यापैकी एक व्यक्ती हा कल्याण पूर्वेतील चक्कीनाका परिसरात राहतो. पोलिसांनी या व्यक्तीच्या दुचाकी गाडीचा नंबरही शोधून काढत त्याचा माग घेतला. पोलिस चक्की नाका येथे पोहोचले. संबंधित व्यक्ती दुचाकी घेऊन चक्कीनाका येथे आला. मात्र त्वरीत दुसऱ्या ठिकाणाकरीता दुचाकी घेऊन निघाला.
रक्कमेच्या कमिशनवर दिला अकाउंट नंबर
पोलिसांनी त्याचा पाठलाग केला असता हा व्यक्ती दुचाकीवरुन पलावा येथे पोहोचला. त्याठिकाणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. अमोल राऊत असे त्याचे नाव असून अमोलने दिलेल्या माहितीवरून टिना चव्हाण या महिलेस पोलिसांनी अटक केली. अमोल याने आपला अकाऊंट नंबर समीर राणे आणि टिना चव्हाण यांना वापरण्यासाठी दिला होता.
ज्या लोकांची फसवणूक केली जात होती. त्यांच्याकडून येणाऱ्या एकूण रक्कमपैकी ३० टक्के रक्कम अमोल घेत होता. उर्वरीत ७० टक्के रक्कम समीर घेत होता. अमोल, टिना आणि समीर हे तिघांपैकी समीर आणि टिना हे अनेक वर्षापासून बँकेचे काम पाहत आहेत. त्यांना लोन कसे दिले जाते याची माहिती असल्याने त्यांनी त्याचा फायदा घेत लोकांची फसवणूक केली. अंबरनाथमध्येही या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.