रावेर (जळगाव) : तालुक्यातील विश्राम जिन्सी या आदिवासी वस्तीतील एका प्रेमीयुगुलाने गावाजवळील शेतात गळफास घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शनिवारी (ता. २३) उघडकीस आली. युवक आणि युवती हे दोघेही एकाच कुटुंबातील असल्याने त्यांच्या विवाहास घरच्यांचा विरोध होता, यामुळे त्यांनी एकत्रित आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त होत आहे. याप्रकरणी येथील पोलिस (Police) ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असली तरीही युवकाच्या वडिलांनी घातपाताचा संशय व्यक्त केल्याने दोघांचे मृतदेह जळगाव (Jalgaon) येथे इनकॅमेरा शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आले आहेत. (jalgaon news Ten days after marriage a young woman commits suicide with her boyfriend)
रावेर-रसलपुर-अभोडामार्गे पालकडे जाणाऱ्या रस्त्यावर विश्राम जिन्सी हे गाव आहे. या गावातील मुकेश पवार (वय २५) आणि गायत्री परशुराम पवार (वय १८) यांचे परस्परांवर प्रेम होते. शुक्रवारी (ता. २२) रात्री सायंकाळपासून हे दोघेही घरातून निघून गेले होते. त्यांच्या नातेवाईकांनी रात्रभर दोघांची शोधाशोध केली. परंतु ते आढळून आले नव्हते. युवकाचे वडील गोकुळ पवार हे पोलिस पाटील आहेत. ते सकाळी त्यांच्या शेतात शोध घेण्यासाठी गेले असता शेतातील झाडावर दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी पोलिसांना कळविताच पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांनी घटनास्थळी भेट दिली. मृतदेह उतरवून रावेर येथे शवविच्छेदनासाठी आणले असता मृत मुकेशच्या वडिलांनी या आत्महत्या नसून त्यांना मारहाण केली असावी, यात काहीतरी घातपाताचा प्रकार असावा असा संशय व्यक्त केल्याने व त्यांच्या इन कॅमेरा शवविच्छेदनाची मागणी केल्याने दोघांचे मृतदेह दुपारी शवविच्छेदनासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहेत.
एकाच कुटुंबातील असल्याने विरोध
मुकेश आणि गायत्री यांचे पणजोबा सख्खे भाऊ होते. यामुळे ते दोघेही एकाच कुटुंबातील म्हणजेच दूरच्या नात्याने का असेना पण एकमेकांचे बहिण-भाऊ लागत असल्याने त्यांच्या विवाहास घरून विरोध होता. त्यातच गायत्रीचा विवाह ४ मे रोजी मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर जवळील एका युवकाशी होणार होता असे समजले. या विवाहाच्या पत्रिकाही वाटल्या गेल्या होत्या. म्हणून दोघांनी एकत्रित आत्महत्या केली असल्याचा संशय व्यक्त होत आहे. विवाहाला अवघे ११ दिवस बाकी असताना युवतीची आत्महत्या झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.