पाचोरा (जळगाव) : सारोळा रस्त्यावरील महादेव मंदिर परिसरात गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. एखादा गुन्हा अथवा रस्ता लुटीच्या उद्देशाने हे दोघे या भागात फिरत असावेत असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. (jalgaon-news-crime-news-Two-arrested-with-cartridges-in-Pachora)
सारोळा रोड भागात दोन तरुण कट्टा व काडतूस घेऊन संशयितरित्या फिरत असल्याची माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली होती. यानंतर त्यांनी पोलीस हवालदार विलास पाटील, हरीश परदेशी, उमेश गोसावी या तिघांना सदर युवकांच्या शोधार्थ पाचोरा येथे पाठवले. पथकाने जारगाव चौफुली, जुना व नवा सारोळा रस्ता हा भाग पिंजून काढला.
दोन युवक दिसले संशयास्पद
तपासकार्यात पोलीस पथकाला सारोळा रस्त्यावरील शांताराम सोनजी पाटील यांच्या जुन्या खडी मशीनजवळ असलेल्या महादेव मंदिराजवळ दोन युवक संशयास्पदरित्या उभे असल्याचे दिसले. पोलिसांनी त्यांना हटकले असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांच्यावर झडप टाकत त्यांना ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता एक गावठी कट्टा, एक जिवंत काडतुस त्यांचे जवळ मिळून आले. अशोक बाबूलाल पवार (वय २८, रा. सारोळा बु. ता. पाचोरा) व सुरज नारायण शिंदे (वय ३०, रा.कृष्णापुरी पाचोरा) अशी या युवकांची नावे असून दोघांकडून दूचाकी असा ५७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेत मुद्देमालासह दोघांना पाचोरा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
पोलिसांकडून तपास सुरू
पोलिसांनी दोघांविरुद्ध शस्त्र बाळगून दहशत निर्माण करणे, गुन्हेगारीच्या उद्देशाने भटकणे या कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. सुरज शिंदे हा वाळू व्यवसायिक असून पवार हा वराह पालनाचा व्यवसाय करतो. दोघांची ओळख कशी झाली? कट्टा व काडतूस कोठून आणले? ते बाळगण्याचे कारण काय? संबंधितांवर कुठे गुन्हे दाखल आहेत काय? याबाबतचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे सह पाचोरा पोलिस घेत आहेत. पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील पुढील तपास करीत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.