संजय महाजन, जळगाव
लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने जळगावच्या सराफ बाजारात आज सकाळपासूनच ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोने आणि चांदीची पूजा करण्याची परंपरा असल्याने नागरिकांनी सोने-चांदीच्या वस्तू खरेदीला विशेष पसंती दिली. विशेषतः लक्ष्मीची मूर्ती, सोन्या-चांदीचे शिक्के आणि पूजेसाठी लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी झाली होती.
सोने खरेदीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगावच्या सुवर्ण बाजारात सणानिमित्त चांगलीच लगबग दिसून आली. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराघरांत धनाची देवता असलेल्या लक्ष्मीची पूजा करून सुख, समृद्धी आणि भरभराटीची प्रार्थना केली जाते. या पूजेसाठी सोन्या-चांदीच्या वस्तूंना विशेष महत्त्व असल्याने अनेक ग्राहकांनी बाजारात खरेदीसाठी गर्दी केली.आज १ तोळा २२ कॅरेट सोन्याचे दर १,३०,०७० रुपये आहे तर, २४ कॅरेट सोन्याचे दर १,४२,००० रुपये इतके आहे. सोन्यासोबतच चांदीचे भाव १,८८,००० रुपये इतके आहे.
ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन सराफ व्यावसायिकांनीही विविध प्रकारच्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. सोन्याचे छोटे तुकडे, महालक्ष्मीचे शिक्के, चांदीच्या लक्ष्मीच्या मूर्ती, चांदीचे शिक्के तसेच विविध डिझाइनमधील दागिने दुकानांमध्ये पाहायला मिळत आहेत. यंदा पूजेसाठी चांदीच्या लक्ष्मी मूर्ती आणि शिक्के खरेदी करण्याकडे ग्राहकांचा अधिक कल दिसून येत आहे.
अनेक नागरिकांनी आपल्या बजेटनुसार सोन्या-चांदीच्या वस्तूंची खरेदी केली. त्यामुळे सकाळपासूनच सराफ दुकानांमध्ये ग्राहकांची ये-जा सुरू होती. लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने बाजारात झालेली गर्दी पाहता जळगावच्या सुवर्ण बाजारात सणाचा उत्साह दिसून आला. परंपरेनुसार लक्ष्मीपूजनासाठी सोने-चांदी खरेदी करण्याला नागरिकांनी यंदाही प्राधान्य दिल्याचे चित्र पाहायला मिळाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.