भारतीय रेल्वेने दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील परभणी-मुदखेड दुहेरी रेल्वेमार्गाच्या आधुनिकीकरणासाठी मोठा निर्णय घेतला आहे. या कामासाठी १६३ कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे सध्या वापरात असलेली रेल्वेची वीजपुरवठा व्यवस्था पूर्णपणे आधुनिक केली जाणार आहे. त्यामुळे या मार्गावर धावणाऱ्या प्रवासी आणि मालगाड्यांची क्षमता वाढणार असून त्यांचा वेगही सुधारण्यास मदत होणार आहे. भविष्यात वंदे भारत एक्स्प्रेससारख्या वेगवान गाड्या या मार्गावर सुरळीतपणे धावू शकतील यासाठीही हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.
या प्रकल्पाअंतर्गत १६४ किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गावर सध्या असलेली १x२५ केव्ही इलेक्ट्रिक ट्रॅक्शन सिस्टीम बदलून तिच्या जागी अधिक आधुनिक आणि जास्त क्षमता असलेली २x२५ केव्ही सिस्टीम बसवली जाणार आहे. म्हणजेच रेल्वेला वीजपुरवठा करणारी संपूर्ण यंत्रणाच अधिक सक्षम केली जाणार आहे.
त्याचबरोबर वाढत्या वीजेची गरज लक्षात घेऊन वीज उपकेंद्रं, वीजपुरवठा व्यवस्था आणि त्यासंबंधित इतर आवश्यक सुविधा देखील आधुनिक केल्या जाणार आहेत. त्यामुळे रेल्वेगाड्यांना अधिक स्थिर आणि अखंड वीजपुरवठा मिळणार आहे. परिणामी तांत्रिक बिघाड आणि वीजपुरवठ्यातील अडथळे कमी होणार आहेत आणि गाड्यांची सेवा अधिक सुरळीत होईल.
परभणी-मुदखेड रेल्वेमार्ग हा भारतीय रेल्वेच्या सर्वाधिक वर्दळीच्या मार्गांपैकी एक मानला जातो. हा मार्ग 'हायली युटिलाइज्ड नेटवर्क' म्हणजेच एचयूएन रूट-९ चा भाग आहे. या मार्गामुळे अजमेर, इंदूर, खांडवा, अकोला, पूर्णा, मुदखेड, सिकंदराबाद, मेहबूबनगर आणि धोन या महत्त्वाच्या शहरांसह अनेक औद्योगिक भाग एकमेकांशी जोडले गेले आहेत. त्यामुळे या मार्गाची क्षमता वाढल्याने प्रवाशांना अधिक चांगली सेवा मिळणार आहे. तर उद्योग आणि व्यापार क्षेत्रालाही त्याचा मोठा फायदा होणार आहे.
या आधुनिकीकरणानंतर वेगवान रेल्वेगाड्या अधिक सुरक्षितपणे आणि कार्यक्षम पद्धतीने धावू शकणार आहेत. मालगाड्यांची वाहतूक क्षमता देखील वाढणार असल्याने रेल्वेच्या मालवाहतुकीलाही मोठी चालना मिळणार आहे. भारतीय रेल्वेने २०२९-३० पर्यंत ३,००० दशलक्ष टन मालवाहतुकीचं उद्दिष्ट ठेवलंय. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी अशा प्रकारचे प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.
देशभरात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या आणि मालवाहतूक दोन्ही सातत्याने वाढताना दिसतेय. त्यामुळे सर्वाधिक वर्दळीच्या रेल्वेमार्गांची क्षमता वाढवणं आणि त्यांना आधुनिक सुविधा देणं ही काळाची गरज बनलीये. त्या दृष्टीने परभणी-मुदखेड रेल्वेमार्गाचं हे आधुनिकीकरण हा केवळ तांत्रिक बदल नसून भविष्यातील रेल्वे वाहतूक अधिक वेगवान, सुरक्षित आणि सक्षम करण्याच्या दिशेने उचललेलं महत्त्वाचं पाऊल मानलं जातंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.