मराठवाड्यात गेल्या दोन आठवड्यांपासून मुसळधार पावसाने थैमान घातल्यामुळे अनेक जिल्ह्यांत गंभीर पूरस्थिती निर्माण झाली होती. मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले. जनजीवन विस्कळीत झाले आणि अनेक गावांचा संपर्क तुटला. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून युद्धपातळीवर मदतकार्य सुरू असताना एसडीआरएफ आणि एनडीआरएफची पथके अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात गुंतली होती.
वरिष्ठ अधिकारी स्वतः गावोगाव जाऊन परिस्थितीचा आढावा घेत होते. या मदतकार्यात धावपळ करीत असतानाच धाराशिवमधील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनक घोष यांनी आपल्या कर्तव्यपरायणतेचं एक वेगळंच उदाहरण घालून दिलं आहे.
पश्चिम बंगालमधील मूळचे असलेले मैनक घोष धाराशिव जिल्ह्यात मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कुटुंबावर अचानक दु:खाचा डोंगर कोसळला. त्यांचे वडील माणिकराव घोष, जे धाराशिवमध्येच वास्तव्याला होते, यांचं २७ सप्टेंबर रोजी निधन झालं. तब्येत गंभीर असल्याने त्यांच्यावर जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. पण अखेर त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुलगा म्हणून मैनक घोष यांनी सोलापूर येथे वडिलांचा अंत्यसंस्कार केला आणि कर्तव्य निभावत दुसऱ्याच दिवशी ते पुन्हा पूग्रस्तांच्या मदतीसाठी दाखल झाले.
पूराच्या विळख्यात सापडलेल्या धाराशिव जिल्ह्यात प्रशासनाचे काम अधिक अवघड बनले होते. अनेक गाव पाण्याखाली गेली होती, तर लोकांना तातडीची मदत आवश्यक होती. मैनक घोष यांनी वैयक्तिक आयुष्यातील या वैधव्याच्या क्षणी स्वत:चं दु:ख बाजूला सारून अधिकारी म्हणून आपलं कर्तव्य निभावलं. ते प्रत्यक्ष गावोगाव जाऊन पूरस्थितीचा आढावा घेत राहिले. ग्रस्तांना अन्न, निवारा, औषधं आणि सुरक्षितता मिळावी यासाठी त्यांनी संबंधित विभागांना सूचना देऊन मदत वेगात पोहोचवली.
सामान्यतः भ्रष्टाचार, पदाचा गैरवापर आणि संवेदनशून्य वर्तणुकीमुळे अनेकदा प्रशासनातील अधिकारी जनतेच्या टीकेचे धनी ठरतात. मात्र अशा कठीण प्रसंगात स्वतःच्या वैयक्तिक आघातावर मात करून लोकांसाठी कार्यरत राहणारे मैनक घोष यांसारखे अधिकारीच जनतेच्या मनात विश्वास निर्माण करतात. त्यांच्या कार्यतत्परतेचं सर्वत्र कौतुक होत असून नागरिकांमध्येही प्रशासनाविषयीचा आदर आणि विश्वास अधिक दृढ झाला आहे.
दरम्यान, धाराशिव जिल्ह्यासह मराठवाड्यात अजूनही पावसाचे ढग कायम असल्याने प्रशासन सतर्क आहे. मात्र लोकांच्या मदतीसाठी दु:ख विसरून उभे राहणाऱ्या अधिकाऱ्यांमुळेच या संकटाच्या काळात आशावाद आणि विश्वासाची किरणं जनतेला दिसत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.