बीड : जेवणाचं बिल मागितल्याच्या रागातून एका वेटरचे अपहरण करत त्याला कारच्या माध्यमातून तब्बल एक किलोमीटर दूरपर्यंत फरपटत नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बीडच्या दिंद्रुड परिसरामध्ये घडली आहे. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे.
तीन मित्रांनी हॉटेलवर जेवण केले. त्यानंतर वेटरला बिल आणण्यासाठी सांगितले. दिलेले बिल 'फोन पे'च्या स्कॅनरवर टाकतो म्हणून बील न देताच गाडीत जाऊन बसले. तर यावेळी गाडीजवळ आलेल्या वेटरला एक किलोमीटरपर्यंत फरफटत नेऊन मारहाण करत रात्रभर ओलीस ठेवले ही घटना माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी सायंकाळी घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, दिंद्रुड पोलीस हद्दीतील मेहकर-पंढरपूर या पालखी महामार्गावर असलेल्या एका हॉटेलमध्ये सखाराम जनार्दन मुंडे आणि अन्य दोघेजण जेवणासाठी चारचाकी गाडीतून आले होते. त्यांनी तेथे जेवण केले. वेटर शेख साहिल अनुसूद्दीनला बिल घेऊन ये, असं सांगितलं. वेटरने बिल दिल्यानंतर ते फोन पेच्या स्कॅनरवर टाकतो म्हणून तिघेजण गाडीत जाऊन बसले.
वेटर स्कॅनर घेऊन ज्या वेळेला गाडीजवळ गेला, त्यावेळेस तू आम्हाला बिल का मागतोस? म्हणून वाद घालत चालकाशेजारी बसलेल्या एकाने त्याला धरून एक किलोमीटरपर्यंत फरफटत नेऊन त्यास तिघांनी मारहाण केली. त्याच्या खिशातील 11,500 रुपयांची रक्कम हिसकावून घेतली. त्यानंतर गाडीच्या पाठीमागे टाकून डोळ्याला पांढरी पट्टी बांधत अज्ञातस्थळी नेत अपहरण केले.
शनिवारी रात्रभर वेटर तरुण गाडीतच होता. दरम्यान रविवारी सकाळी धारूर तालुक्यातील भाईजळी शिवारात त्याला सोडून देण्यात आले. शेख साहिल अनुसूद्दीन या वेटरच्या फिर्यादीवरून सखाराम जनार्दन मुंडे आणि अन्य अनोळखी दोघांच्या विरोधात दिंद्रुड पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.