हिंगोली शेतकऱ्यांनी एसबीआय बँकेला टाळे ठोकले
कर्जमाफी झाल्यानंतर शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक
कुरुंदा गावात शेतकऱ्यांचे बँकेविरोधात आंदोलन
हिंगोलीमध्ये शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना बँकेमध्ये कोंडले
कर्जमाफी होऊन पीक कर्ज मिळत नसल्याने हिंगोलीमधील शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांनी थेट बँकेच्याअधिकाऱ्यांना बँकेत कोंडले आणि बाहेरून बँकेला टाळं ठोकले. हिंगोलीच्या कुरुंदा गावात ही घटना घडली. शेकडो शेतकऱ्यांनी कर्ज मिळत नसल्याने आक्रमक पवित्रा घेतला. याचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.
मराठवाड्यात कोरड्या दुष्काळामुळे शेतकरी आत्महत्या करत असताना दुसरीकडे बँकेचे अधिकारी कर्जमाफी होऊन देखील शेतकऱ्यांना पीक कर्ज देत नाही. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. अशातच हिंगोलीमध्ये कर्ज मिळत नसल्यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्यांनी बँकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बँकेत कोंडून ठेवले. त्यानंतर त्यांनी बँकेला बाहेरून टाळे लावले. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील कुरुंदा गावामध्ये संभाजी ब्रिगेडकडून शेतकऱ्यांना सोबत घेत आंदोलन करण्यात आले.
शेतकरी कर्जमाफीच्या यादीमधील शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास स्टेट बँक ऑफ इंडियाचे अधिकारी आणि कर्मचारी टाळाटाळ करत आहेत. तर ज्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले मात्र ते इतर शेतकऱ्यांचे ग्यारंटर आहेत अशा शेतकऱ्यांना कर्ज देणार नसल्याचा पवित्रा बँक अधिकाऱ्यांनी घेतला असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला. संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी अलोक इंगोले पाटील यांनी बँक व्यवस्थापनाच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेतले.
दरम्यान, राज्यामध्ये यंदा चांगला पाऊस झाला नाही त्यामुळे अनेक जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाऊस नसल्यामुळे शेतामधील पिकं करपली, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, जनावरांच्या चारापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता फडणवीस सरकारने आधी २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर केला. त्यानंतर इतर तालुक्यांची नावं देखील दुष्काळी तालुक्यांच्या यादीत जाहीर केले. सध्या सरकारकडून दुष्काळी भागाचे पंचनामे सुरू आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.