अमित गवळे, पाली
रायगड जिल्ह्याला शनिवारी (ता. 4) पावसाने झोडपून काढले. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली. पोलादपुरात दरड कोसळल्याने परिसरातील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. सायंकाळी सुधागड तालुक्यातील भेरव येथील अंबा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने तेथील वाहतूक बंद करण्यात आली.
रायगड जिल्ह्यात सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सरासरी ६३.७६ मिमी पावसाची नोंद झाली.यामध्ये सर्वाधिक पाऊस पेण (१०५ मिमी, खालापूर १०१ मिमी आणि कर्जत ७८ मिमी तालुक्यात झाला आहे. जिल्ह्यातील एकूण पाऊस १०२०.२ मिमी झाला असून, हेटवणे मध्यम प्रकल्प सध्या ३२.८० टक्के भरला आहे. तसेच जिल्ह्यातील २८ लघू प्रकल्पांपैकी ६ प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.
पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. अंबा नदीने धोका पातळी ओलांडली असून, कुंडलिका आणि पाताळगंगा नद्या इशारा पातळीवरून वाहत आहेत. त्यामुळे नदीकाठच्या आणि सखल भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात पूरपरिस्थिती सध्या नियंत्रणात असून, सर्व प्रमुख रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू आहे.
पावसामुळे पोलादपूर तालुक्यातील मौजे सोनारवाडी येथे दरड कोसळण्याची घटना घडली. सुरक्षेचा उपाय म्हणून येथील दोन कुटुंबांतील ७ व्यक्तींना वडघर येथील अंगणवाडीत सुखरूप स्थलांतरित करण्यात आले आहे. कर्जत तालुक्यात पुराच्या पाण्यात बुडून एका बैलाचा मृत्यू झाला असून, खालापूर येथे झाड कोसळून एका गोठ्याचे नुकसान झाले आहे.
माणगाव, तळा, महाड, रोहा, अलिबाग आणि मुरुड तालुक्यांमध्ये घरे, झोपड्या व भिंती पडल्याने अंशतः नुकसान झाले आहे. सुदैवाने जिल्ह्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अलिबाग आणि इतर काही तालुक्यातील शाळांना शनिवारी (ता.4) सुट्टी जाहीर करण्यात आली होती. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवले जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.