गणेश शिंगाडे
गडचिरोली : सिरोंचा येथील माध्दिकुंटा रेती घाटांवर वाळू साठवण करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र एक जागेत परवानगी घेऊन दुसऱ्या ठिकाणी वाळू साठवण करण्यात आल्याचा मुद्दा समोर आला होता. अर्थात कामात कसूर केल्या प्रकरणी जिल्हाधिकारी यांनी कारवाईचे पाऊल उचलले असून गडचिरोली जिल्ह्यात वाळू तस्करी संदर्भात एक तलाठी व एक मंडळ अधिकारी या दोघांना निलंबित करण्यात आले आहे. तर तहसीलदार यांच्यावर देखील कारवाईची शिफारस करण्यात आली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात अवैध रेती उत्खनन आणि गौण खनिज वाहतुकीच्या प्रकरणी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी मंडळ अधिकारी राजू खोब्रागडे आणि तलाठी अश्विनी सडमेक यांना निलंबित केले आहे. या कारवाईमुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. सिरोंचा तालुक्यात वाळू माफियांचा धुमाकूळ सुरू असल्याच्या आणि महसूल विभागाकडून त्यावर नियंत्रण ठेवण्यात निष्काळजीपणा झाल्याच्या तक्रारी माध्यमांतून वारंवार प्राप्त होत होत्या.
तक्रारीनंतर करण्यात आली चौकशी
दरम्यान प्राप्त तक्रारीवरून जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ उपविभागीय अधिकारी अहेरी यांना चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार २ ऑक्टोबरला मौजा मद्दीकुंठा व चिंतरेवला या रेती घाटांवर करण्यात आलेल्या चौकशीत तब्बल १५ हजार ६६५ ब्रास अवैध रेती साठा आढळून आला. त्यासाठी २९ कोटीपेक्षा अधिक रकमेचा दंड प्रस्तावित करण्यात आला आहे. तसेच दोन जेसीबी, एक पोकलँड मशिन आणि पाच ट्रक रेती उत्खनन व वाहतुकीसाठी वापरले जात असल्याचे निष्पन्न झाले.
कामात कसूर केल्याप्रकरणी दोघांचे निलंबन
दरम्यान, महसूल विभागाच्या शासन निर्णयानुसार ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील वाळूगटाची नियमित पाहणी करून अवैध उत्खननाबाबत वरिष्ठांना अहवाल देणे अपेक्षित असते. मात्र, अश्विनी सडमेक यांनी ही जबाबदारी पार पाडण्यात दुर्लक्ष केल्याचे चौकशीत दिसून आले. तसेच मंडळ अधिकारी राजू गणपतराव खोब्रागडे यांनी देखील रेती घाटाची पाहणी व दैनंदिन नोंद ठेवण्यात कसूर केल्याचे आढळले. यावरून जिल्हाधिकाऱ्यांनी १५ ऑक्टोबर रोजी तात्काळ प्रभावाने निलंबित केले.
तहसीलदारांवर कारवाईची शिफारस
या चौकशीत महसूल कर्मचाऱ्यांची निष्क्रियता स्पष्ट झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार निलेश होनमोरे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून त्यांच्यावर कारवाई करून बदली करण्याची शिफारस विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्याकडे केली आहे. अवैध रेती उत्खनन प्रकरणी जिल्ह्यातील महसूल यंत्रणेने सजग राहण्याचे व कोणताही निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.