Dr B T Deshmukh passes away in Amravati : विदर्भाच्या शैक्षणिक आणि वैचारिक क्षेत्राचे मार्गदर्शक, अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार प्रा. डॉ. बी. टी. देशमुख यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी अमरावतीत दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रातील एका अभ्यासू आणि निस्पृह संसदीय पर्वाचा अंत झाला आहे.
सलग तीन दशके विधान परिषदेत शिक्षक आणि पदवीधरांचे अचूक प्रतिनिधित्व करणारे डॉ. देशमुख हे 'नुटा' (NUTA) संघटनेचे शिल्पकार होते. सभागृहात केवळ आकडेवारी आणि पुराव्यांच्या आधारे सरकारला धारेवर धरण्याचे त्यांचे कसब अद्वितीय होते. विदर्भाच्या सिंचन अनुशेषाचा प्रश्न राज्य पातळीवर मांडून त्यांनी या भागाला न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या पार्थिवावर उद्या, रविवारी सायंकाळी ५ वाजता अमरावतीत अंत्यसंस्कार केले जाणार असून, सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.
बी.टी. सरांच्या निधनाने वैयक्तिक मार्गदर्शकाला मुकलो!- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
माजी आमदार, शिक्षणतज्ञ आणि विविध सामाजिक प्रश्नांचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ नेते प्रा. बी. टी. देशमुख यांच्या निधनाने महाराष्ट्र एका मोठ्या संघर्षशील नेतृत्त्वाला मुकला आहे. माझ्या जीवनातील एक मार्गदर्शक मी गमावला आहे, अशी भावपूर्ण श्रद्धांजली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
आपल्या शोकसंदेशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की, ज्यासाठी संघर्ष केला, त्यासाठी जीवन समर्पित असेच आयुष्य ते जगले. मला तर त्यांच्याकडून व्यक्तिगतदृष्ट्या खूप काही शिकायला मिळाले. त्यांचे कायमच मोलाचे मार्गदर्शन मिळायचे. राजकारण आणि समाजकारण एकच आहे, असे मानणार्या पिढीचे ते नेतृत्त्व करीत होते. अमरावती पदवीधर मतदारसंघाचे विधानपरिषदेत त्यांनी पाचवेळा प्रतिनिधीत्त्व केले. प्राध्यापक, शिक्षकांच्या हक्कांसाठी तर ते लढलेच, पण अनेक सामाजिक प्रश्नांना त्यांनी विशेषत्त्वाने वाचा फोडली. एक अत्यंत अभ्यासू आणि प्रेरणादायी असे हे व्यक्तिमत्त्व होते.
विधानपरिषदेतील त्यांची भाषणे ऐकत रहावी वाटायची. ती आजही नवीन सदस्यांसाठी प्रेरणादायी आहेत. विदर्भाच्या अनुशेषाविरोधात त्यांनी दिलेला लढा अत्यंत मोलाचा होता. मला आजही आठवते, सरकारी दरबारी भांडून न्याय मिळत नाही, म्हणून त्यांनी अनुशेष निर्मूलनासाठी थेट हायकोर्टात याचिका केली होती. सुनावणीच्यावेळी बी.टी. सरांसोबत मीही उपस्थित राहत होतो. सिंचन, पेयजल योजना यासाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला. अमरावती विद्यापीठाच्या निर्मितीत सुद्धा त्यांचे योगदान होते. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.