सचिन बनसोडे, साम टीव्ही
श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेच्या तक्रारीनंतर राहुरी पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, गुन्हा दाखल होताच पोलिसांनी मुरकुटे यांना अटकही केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. भानुदास मुरकुटे हे अहिल्यानगर जिल्ह्यातील मोठे प्रस्थ आहेत.
त्यांना लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रार देणारी महिला राहुरी तालुक्यातील आहे. पीडिता २०१९ मध्ये भानुदास मुरकुटे यांच्याकडे कामाला होती. त्यावेळी मुरकुटे यांनी विविध प्रलोभन देऊन आपल्यावर वारंवार लैंगिक केला, असा आरोप पीडितेने केला आहे.
यासंदर्भात तिने सोमवारी (ता. ७) पोलिसांत तक्रार देखील दाखल केली आहे. तक्रार दाखल होताच पोलिसांनी माजी आमदार मुरकुटे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी मध्यरात्री त्यांना राहत्या घरातून अटक केली आहे. मात्र, अटकेनंतर रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना नगरमधील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
भानुदास मुरकुटे हे प्रदीर्घ काळापासून जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय आहेत. आतापर्यंत तीनवेळा ते काँग्रेसच्या तिकीटावर आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. 1980 मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर त्यांनी पहिली विधानसभा निवडणूक लढवली होती. यावेळी मुरकुटे यांनी जवळपास 25 ते 26 हजारांच्या मताधिक्यांनी विजय मिळवला होता.
सध्या ते अशोक सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आहेत. आधी काँग्रेस त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि मध्यतंरी मुरकुटे यांनी जिल्ह्यातील 35 सरपंचासह तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षात प्रवेश केला होता. अलिकडे कारखान्यातील ऊस पळवापळवीच्या कारणातून त्यांनी महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर जोरदार टीका केली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.