भूषण अहिरे, धुळे प्रतिनिधी
Dhule BJP Mayor Mayadevi Pardeshi News : सोशल मीडियावर होणाऱ्या बदनामीकारक पोस्टला कंटाळून धुळे महानगरपालिकेच्या भाजपच्या महिला महापौर मायादेवी परदेशी यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भाजप आमदार अनुप अग्रवाल यांनी या घटनेबाबत माहिती दिली. त्यानंतर संपूर्ण धुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. सध्या महापौरांवर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आणि उत्तम असल्याची माहिती आमदारांनी दिली आहे.
नेमकं प्रकरण काय?
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर महापौर मायादेवी परदेशी यांच्या संदर्भात अत्यंत आक्षेपार्ह आणि बदनामीकारक मजकूर व्हायरल केला जात होता. या सततच्या मानसिक त्रासाला आणि बदनामीला कंटाळून महापौरांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणी संजय शर्मा नावाच्या व्यक्तीविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धुळ्यात महिलांचा भव्य निषेध मोर्चा
महापौरांच्या संदर्भात झालेल्या या बदनामीकारक प्रकाराविरोधात धुळे शहरातील महिलांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळत आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज धुळ्यात मोठ्या संख्येने महिलांनी एकत्र येत निषेध मोर्चा काढला. या मोर्चात आमदार अनुप अग्रवाल हे देखील सहभागी झाले होते.
महिला लोकप्रतिनिधींची अशा प्रकारे सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्या विकृत प्रवृत्तींवर पोलीस प्रशासनाने कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी आमदार अनुप अग्रवाल यांनी या मोर्चाच्या माध्यमातून केली आहे. या घटनेमुळे धुळ्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.